शहाबानो ते सायराबानो ; तिहेरी तलाकविरोधातल्या संघर्षाची कहाणी

शहाबानो ते सायराबानो ; तिहेरी तलाकविरोधातल्या संघर्षाची कहाणी

शहाबानो ते सायराबानो असा हा तिहेरी तलाक विरोधातला लढा खरंतर 50 वर्षांपासून सुरू आहे. हमीद दलवाईंनीच 1966साली तलाकविरोधात पहिला मोर्चा काढला होता. पण हा लढा सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर तिहेरी तलाक, तोंडी तलाक, तिहेरी तलाक या शब्दांचा मारा माध्यमातूनही होऊ लागलाय देखील होतोय.

  • Share this:

हलीमा कुरेशी, प्रतिनिधी, पुणे

शहाबानो ते सायराबानो असा हा तिहेरी तलाक विरोधातला लढा खरंतर 50 वर्षांपासून सुरू आहे. हमीद दलवाईंनीच 1966साली तलाकविरोधात पहिला मोर्चा काढला होता. पण हा लढा सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर तिहेरी तलाक, तोंडी तलाक, तिहेरी तलाक या शब्दांचा मारा माध्यमातूनही होऊ लागलाय देखील होतोय. गेल्या वर्षभरापासून ही सुनावणी सुरू होती. तर मुल्ला मौलवी, उलेमा हे तलाक या प्रथा किती छान म्हणून त्याला कुरुवाळत होते. तलाक एकाच दमात तीन वेळा तलाक...तलाक...तलाक म्हणून दिला जात नाही. पण याचा कितीजण विचार करतात. याच उत्तर कोणीच नाही असं म्हणायला हवं.

माझ्या वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत मला तलाक विषयी काहीही माहीत नव्हतं. माझ्या नातेवाईकांमध्ये केवळ माझ्या लांबच्या आत्याला तलाक दिला गेला होता एवढंच काय ते ठाऊक होत. खरंतर पहिल्या पत्नीची रजामंदी असल्याशिवाय दुसरी शादी करता येत नाही. पण सध्या तलाक दयायचा आणि दुसऱ्या महिन्यात दुसरा निकाह करायचा अशी फॅशनच आली होती. आयेशाला तलाक दिला गेला तोही दिल का दिलमे...! मुलगी झाली म्हणून, आणि तिचा नवरा लगेचच दुसरा (खरंतर तिसरा ) निकाह करून मोकळा झाला. तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला या प्रथा बंद करायला हव्यात. कायदेशीर पद्धतीने घटस्फोट व्हायला हवेत, मुलीच्या आयुष्याचा विचार केला गेला पाहिजे. ती जणू एखादी बाहुली आज तिच्याबरोबर खेळून झालं की टाकून द्यावी. अनेक मुस्लिम महिलांचं जीवन जहन्नुम बनलं. मुलगी शिकलेली असली तरी तिला टोमणे मारले जातात. जास्त हुंडा हवा, लग्नात मानपान झाले नाही म्हणूनही तलाक दिले गेलेत...हे कितपत समर्थनीय आहे. आर्शिया अतिशय देखणी, सुसंस्कृत लग्नाला दोन वर्ष झाली नाही तोच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र तिच्या नवऱ्याने आनंद तर दूरच..तू माझ्या मनातून उतरली असं म्हणून तिला नोटिसीद्वारे तलाक पाठवला.

पवित्र कुराण ऐकत मी मोठी झाले...पैगंबर साहेबांनी आदर्शवादी जीन जगले, बीबी फातिमा या अतिशय तेजस्वी आदर्श मुलगी, अली साहेबांनी स्वतः च्या घरात काही खायला नसताना दारावर आलेल्या भिक्षुकाला लहान मुलाच्या वाट्याचं जेवण दिलं. या सगळ्याचा माझ्या लहान मनावर मोठा परिणाम झाला. पैगम्बर साहेबांनी मुलीच्या जन्माचा जश्न साजरा करा, निकाहाच्या वेळेस मुलीच्या वडिलांना काहीही त्रास होणार नाही अशा पद्धतीने निकाह करा, निकाहामध्ये तिला मेहेरची (मेहेर ही नवऱ्या मुलाकडून नवरीला दिली जाते. ही रक्कम तिच्या भविष्यात वापरता यावी, असा त्यामागचा हेतू असावा ) रक्कम चांगली द्या. मात्र होतंय उलट नवरी मुलीला केवळ हजारच्या आत रक्कम अदा केली जाते, काही हावरट दिल माणसं ही रक्कम देखील माफ करून घेतात. मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो. हे सर्व करताना पवित्र कुराण आणि हदीसचा सोईस्कर विसर पडतो.

तलाकबंदी झाल्याने भारतीय दंड संहितेचा कलम २५ चा भंग होतोय अशी गरळ पर्सनल लॉ ओकतंय. गरीब घरातल्या अनेक मुलींना तलाक दिले गेले. त्या ना कोर्टात जाऊ शकतात ना मौलवींच्या विरोधात उभ्या राहू शकतात. माध्यमात आल्या तरी त्यांना धमक्या दिल्या जातात. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तिहेरी तलाक बेकायदा म्हणत सहा महिन्यात संसदेला कायदा करण्याचे आदेश दिले. या निर्णयाने समाधान नक्कीच आहे मात्र कायदा बनवताना त्यात तलाकपीडित महिला, याचिकाकर्त्या, तलाकविषयी लढणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ यांची मतं घेणं गरजेचं आहे. तलाक - हलाला - बहुपत्नीत्व या सर्व एकमेकांशी निगडित प्रथा आहे. यातील तलाक घेताना आणि देताना कोर्टातूनच प्रक्रिया झाल्यास चांगला चाप बसेल यात शंका नाही. केंद्र सरकार याविषयी सकरात्मक आहे हे स्वागतारार्ह आहे.

इथून पुढे मुस्लिम महिलांना सबळ करण्यासाठी केंद्र सरकारने मोहल्ल्यात जाऊन योजनांची माहिती द्यायला हवी, त्या योजनांचा लाभदेखील मिळवून द्यायला हवा. सच्चर समितीचाही विसर पडलाय. त्याचाही विचार झाला पाहिजे. तलाकप्रमाणेच मुस्लिम मुलींच्या शिक्षणासंदर्भात देखील गंभीरपणे विचार व्हायला हवा. शिक्षणच मुस्लिम महिलांनां सबळ करेल; यात शंका नाही. महिला कुठल्याही धर्मातील असो वा जातीतील तिचा आदर झाला पाहिजे, हिंदू महिला, मुस्लिम महिला असा विचार न होता महिला म्हणून सर्व कायद्यांचा लाभ मिळवून द्यायला पाहिजे. त्यांच्या मानवी हक्कांचा अधिकारांचा विचार व्हायला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 07:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading