शिरुर 12 ऑगस्ट: पुणे ग्रामीण पोलीसांच्या लाचखोरीची चर्चा दिवसभर विविध माध्यमात गाजत असताना बुधवारी दुपारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एका अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. त्यामुळे पोलिसांची इज्जत वेशीवर टांगली गेल्याची टीका होत आहे. एकाच दिवशी एकूण 3 ग्रामीण पोलिसावर कारवाई केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
नारायणगाव(ता.जुन्नर) व शिक्रापूर( ता. शिरूर ) येथील पोलिसांचा यात समावेश आहे. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाई मुळे पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील (वय 38) यांना तत्काळ निलंबित करण्यात आले तर पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे(वय 37) यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
‘News18 लोकमत’ Impact: त्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर न्याय मिळणार
याबाबत बोरी येथील व्यक्तीवर सावकारकीच्या पैशातून केलेल्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. अपहरणाचा गुन्ह्यात मदत करण्यासाठी, न्यायालयात लवकर दोषारोप पत्र सादर करण्यासाठी तसेच गुन्ह्यातील 2 आरोपीना अटक न करण्यासाठीं सहायक पोलिस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक हांडे यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी तक्रारदारकडे 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या विभागाने सापळा लावला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
तर अन्य एका घटनेत शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये खोडसाळपणा करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
शिक्रापूर येथे 22 जुलै रोजी एम एच १४ एच पी ७२९१ हा वाळू वाहतूक करणारा ट्रक कारवाई करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेला असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी काही इसमाच्या सहभागाने बेकायदेशीरपणे सदर ट्रक मधील वाळू वर दगडाचे बारीक क्रशखडी टाकून खोडसाळपणा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
निवासी डॉक्टरांसाठी Good News, कोरोना विरुद्ध लढत असतांनाच वेतनात झाली मोठ वाढ
याबाबत माहिती पुढे आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.
सदर चौकशीमध्ये पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी हे गैरकृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याने संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत पांडूरंग इनामे यांना सेवेतून तात्काळ निलंबित केले असून त्यांचे विरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.