पुणे, 2 फेब्रुवारी : पुणे (Pune) ग्रामीण पोलीस दलातील श्वान असलेल्या 'सिबा'ने गुन्हेगारांच्या चपलांच्या वासावर पोलिसांना एका गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पकडून देण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव कर्डे रोड येथील गावडे वस्ती येथे 29 जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यानी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने खोली समोरील पत्र्याच्या पडवीमध्ये झोपलेल्या पाच व्यक्तींना मारहाण करत त्यांच्याकडील दोन तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. चोरट्यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
हेही वाचा - पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांवरून प्रवीण दरेकर यांनी दिला आक्रमक इशारा
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तपासासाठी वेगवेगळी चार तपास पथके तयार करुन आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आणि रेकॉर्डवरील आरोपींच्या फोटोची मिळतेजुळते संशयित आरोपींचा शोध सुरू झाला. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेऊन घटनास्थळी आढळलेल्या चपलांच्या ठस्यांच्या आधारे श्वान 'सिबा'नेचपलांचा वास घेऊन संशयित आरोपीमधून गुन्ह्यातील दोन आरोपींना ओळखले.
त्यानुसार आरोपी सुरज मनचक्या भोसले (वय 20), दीपक मनचक्या भोसले (वय 23) दोघे राहणार करपडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर यांना 1 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.