पुणे, 18 मे : पुणे (pune) शहरात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेली कोरोनाची (corona)दुसरी लाट आता कुठे आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल तीन महिन्यांनी पुणे शहरातील कोरोनाची दैनंदिन रूग्णवाढ 700 च्या खाली आली आहे. दिड महिन्यांपूर्वी हाच आकडा तब्बल 7 हजाराच्याही पुढे गेला होता. यावरून दुसऱ्या लाटेनं पुण्यात किती धुमाकूळ घातला होता सहज स्पष्ट होतंय पण अखेर महिन्याभराचे लॉकडाऊन आणि पुणेकरांची बऱ्यापैकी आणि प्रशासनाचे प्रयत्न या सगळ्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आता कुठे पुण्यातील कोरोनाची दैनंदिन रूग्णवाढ तीन आकड्यांवर येऊन ठेपली आहे.
17 मे 2021 च्या आकडेवारीनुसार, पुण्यात अवघे 684 नवे रूग्ण आढळून आलेत. तसंच पॉजिटिव्ही रेटही 10 टक्क्यांच्या आसपास येऊन ठेपला. हा पुणेकरांसाठी निश्चितच मोठा दिलासा म्हणावा लागेल पण त्याचवेळी पुणे ग्रामीणचा दैनंदिन आकडा मात्र अजूनही पंधराशेच्या आसपास रेंगाळताना दिसतोय सर्वसाधारणपणे शहरातील रूग्णवाढ ही ग्रामीणच्या दुप्पट असायची पण पहिल्यांदाच हेच चित्र सोमवारी उलट बघायला मिळालंय. 17 मे रोजी पुणे शहरात 684 तर ग्रामीण भागात 1465 रूग्ण आढळून आले. त्यामुळेच प्रशासनाला ग्रामीण भागातली रूग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
मध्यंतरी पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पीक पॉईंटला असताना पुणे शहरातील रूग्णवाढीचा दैनंदिन आकडा हा तब्बल 7 हजारांवर तर ग्रामीण भागातला आकडा हा 4 हजारांवर जाऊन पोहोचला होता. याच दरम्यान दैनंदिन कोरोना मृतांचा आकडा तब्बल 170 च्या आसपास गेला होता. याकाळात पुणे शहरात बेड्स, ऑक्सीजन, रेमडीसीवीर इंजेक्शन्स अशा सगळ्याच आवश्यक गोष्टींचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्याचाच परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या तब्बल 15 हजार 441 वर जाऊन पोहोचली.
मध्यंतरी तर कोरोना मृत्यूदर अडीच टक्क्यांवर पोहोचला होता. आताही पुणे शहरातील क्रिटिकल रूग्णसंख्या ही 1400 च्या आसपास आहे. त्यामुळेच प्रशासनाला हा वाढता मृत्यूदर कमी करण्याला प्राथमिकता द्यावी लागणार आहे. सुदैवाने पुणे शहरात अँक्टिव्ह रूग्णसंख्या आता 18 हजारांपर्यंत खाली आली. कधीकाळी हाच एक्टिव्ह रूग्णसंख्येचा आकडा तब्बल 57 हजारांवर जाऊन पोहोचला होता. तेव्हा शहरात कित्येक रूग्णांचे मृत्यू हे केवळ बेड्स मिळू न शकल्याने झाल्याचं प्रशासनाला उघड्या डोळ्याने बघावं लागलं. अनेकांना तर बेड्स मिळूनही केवळ ऑक्सीजन नाही म्हणून जीव सोडावा लागला. म्हणूनच संभाव्य तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती पुन्हा ओढवणार नाही, यासाठी पालिका प्रशासन आतापासूनच तयारी करतंय.
पुणे मनपाने आपल्या हॉस्पिटलच्या आवारातच हवेतून ऑक्सीजन निर्मितीचे प्लांट उभे करण्याचा निर्णय घेतलाय. चार नायडू, दळवी, बाणेर आणि लायगुडे या मनपा हॉस्पिटल्समध्ये प्लांट बसवून देखील झाले आहेत. एवढीच काय समाधानाची बाब म्हणावी लागेल.
दरम्यान, पुणे ग्रामीणमधील कोरोनाची रूग्णवाढ आटोक्यात का येत नाही? याबद्दल जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी शहराच्या आजुबाजुच्या गावांकडे अंगुलीनिर्देश केला. ते काही प्रमाणात खरं असलं तरी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिक्रापूर, बारामती, दौंड, चाकण इथल्या रूग्णवाढीचं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यामुळेच आता जिल्हा प्रशासनाला ग्रामीण भागातली कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. नाहीतर पुणे शहरात कोरोना आटोक्यात आणि ग्रामीण भागात वाढता फैलाव असं चिञं बघायला मिळेल.
पुण्यातील आकडेवारी
पुण्यात सोमवारी 2790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधित 66 रुग्णांचा मृत्यू झाला यात 23 रूग्ण पुण्याबाहेरील आहे.1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 459987 असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 18440 इतकी आहे. एकूण 7749 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.