पुणे, 25 मे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचं थैमान वाढतच चाललं आहे. पुण्यात आजही 205 रुग्णांची वाढ झाली आहे. पुणे शहरातही 5 हजार रग्णांचा टप्पा पार झाला आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 5049वर पोहोचली आहे. तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 5899 रूग्ण आढळले आहेत.
चौथा लॉकडाऊन संपण्याच्या उंबरठ्यावर असतानाही पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश येत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. पुण्यात आणखी 4 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 276 वर पोहोचली आहे. अशा स्थिती कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आता आणखी खंबीरपणे काम करावं लागणार आहे. कारण शहरातील स्थिती अजूनही नियंत्रणात असली तरीही वाढणारी रुग्णसंख्या धोक्याची घंटा ठरत आहे.
रुग्ण संख्या वाढत असताना पुण्यात संतापजनक प्रकार
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरवरच दारूच्या बाटल्या मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुण्यातील मिकमार कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. नानापेठेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत असतो.
आज सकाळी नानापेठेतील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जेवणाचे डबे आले होते. पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या बाटल्या पाहून पोलीस आणि पालिका प्रशासनही हादरून गेलं.
भारतातील तरुणांना कोरोनाचा धोका
जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला त्या देशातल्या आकडेवारीवरून तिथे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात बळी गेला आहे. मात्र विकसित आणि तरुण देश समजल्या जाणाऱ्या भारत आणि ब्राझीलमध्ये हा व्हायरस तरुणांचा जास्त बळी घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या अहवालानुसार ब्राझिलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 50 पेक्षा कमी वयाचे 5 टक्के लोकं आहेत. स्पेन आणि इटलीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्के जास्त आहे. तर भारतात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 60 टक्के लोक हे 50 पेक्षा कमी वयाचे आहेत असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
संपादन - अक्षय शितोळे