सुमित सोनवणे, दौंड, 19 नोव्हेंबर : दौंड शहरातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा दोन अल्पवयीन मुलांनी खून केल्याचं समोर आलं आहे. खून केल्यानंतर तब्बल 75 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि दौंड पोलिसांनी हा गुन्हा उघड केला आहे.
दौंड तालुक्यातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा 4ऑक्टोबरला दौंडमधील लिंगाळी रस्त्याजवळील काळे मळा येथील कालव्याजवळ डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
दौंड - कुरकुंभ रस्त्यावर एका खासगी कंपनीतील विक्री अधिकारी असणारे संजय मिश्रीलाल मुनोत यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आरोपींना आणि लुटीचा माल घेणाऱ्या एका तरूणाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यापैकी दोघांनी केदार भागवत यांचा खून केल्याचा उलगडा झाला.
4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दौंड शहरातील जयहरी चौक ते शालीमार चौक दरम्यान दोन अल्पवयीन आरोपींनी केदार भागवत यांना लिफ्ट दिली होती. दुचाकीवर गप्पा मारत बोरावकेनगर येथून तिघे काळे मळा येथील कालव्याजवळ आले. अंधारात दोघांनी पैशांची मागणी केली. परंतु भागवत यांच्या खिशात फक्त वीस रूपयेच मिळाल्याने दोघांनी बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याचे तपासात पुढे आले आहे.