जुन्नर, 31 ऑगस्ट : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील बाजारसमितीच्या हद्दीत असणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीत माय लेकीचा मृतदेह तरंगताना आढळला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बेल्हे गावात तीन जिल्ह्यातला सर्वात मोठा बैल बाजार आणि जनावरांचा बाजार याच ठिकाणी भरत होता. मागील महिन्यापासून कोरोनामुळे हा बाजार बंद आहे. साधारण 60 फुट खोल व 10 फुट व्यास असणाऱ्या या विहीरीत आज सकाळी 10 वा. ग्रामपंचायत कर्मचारी गुड्डु शिरतर यांना हे दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती गावकामगार पोलीस पाटील बाळकृष्ण पिराजी शिरतर यांना कळवली.
खात्री करण्यासाठी पोलीस पाटील त्या ठिकाणी गेले असता संतोष अच्युतराव भालेराव यांनी सांगितले की सदरचा मृतदेह त्यांची पत्नी शितल संतोष भालेराव( वय 40वर्ष ) व मुलगी आर्या संतोष भालेराव (वय 5 वर्ष ) या दोघींचा आहे. रात्रीपासून या दोघी घरातून निघून गेल्या होत्या. मला माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो तर ते मृतदेह माझी पत्नी व मुलीचे असल्याचं कळालं, अशी माहिती संतोष अच्युतराव भालेराव यांनी पोलिसांना दिली.
पोलीस पाटील यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला खबर दिली असता आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर तातडीने घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरीतून बाहेर काढले.
त्यावेळी सहा. फौजदार एस. एम. भवारी, पोलीस नाईक संदिप फड, नरेंद्र गोराणे, एम. एस. पठारे, मोहन आनंदगावकर, चालक रहाणे व पोलिसांना मदत करणारे राजेंद्र मटाले, स्वप्नील भंडारी, मयुर भालेराव, गौस इनामदार, वसंत पाबळे, पोपट संभेराव, रोहीदास पिंगट या ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काढले. सदर घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.