पुणे, 20 फेब्रुवारी: महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ (Temperature in Maharashtra) होताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील थंडी (Cold weather) पूर्णपणे गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पहाटे गारठा जाणवत असला तरी बहुतांशी ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात 3 ते 4 अंशाची वाढ नोंदली आहे. आज पुण्यात पहिल्यांदाच किमान तापमानाचा पारा 20 अंशावर (Temperature in Pune) गेला आहे. मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील किमान तापमान 20 अंशाच्या खालीच राहिलं होतं.
यासोबतच राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानाचा पारा 33 अंशाच्या वर नोंदला गेला आहे. येत्या काही दिवसात राज्यात किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे नोंदलं होतं. येथील पारा 35.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे सोलापुरकरांना दुपारच्या सुमारास उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले आहेत. आजही सोलापूरसह राज्यातील तापमान कमी अधिक प्रमाणात हेच कायम राहणार आहे.
हेही वाचा-आहारासंबंधित ही 2 लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा अलर्ट! असू शकतो ओमिक्रॉनचा धोका
मागील बऱ्याच दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात आज पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्या पार गेला आहे. पुणे जिल्ह्यात आज मगरपट्टा, वडगावशेरी आणि भोर याठिकाणी अनुक्रमे 20, 20.7 आणि 21.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पाषाण आणि राजगुरूनगर येथे सर्वात कमी प्रत्येकी 12.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं गेलं आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील किमान तापमान 12 ते 19.8 च्या दरम्यान आहे.
हेही वाचा-कोरोनाचा नवीन प्रकार Deltacron किती धोकादायक? काय म्हणतायेत भारतीय शास्त्रज्ञ?
दुसरीकडे, उत्तर भारतात देखील थंडी गारठ्यासह पावसाचा जोर कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून वायव्य आणि मध्य भारतात देखील उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. पण सध्या देशात ईशान्यकडील वारे सक्रीय झाल्याने ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पश्चिम हिमालयासह उत्तर भारतात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.