पुणे, 17 डिसेंबर : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची घोषणा 9 नोव्हेंबर 2022 ला दिल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 28 नोव्हेंबरपासून निवडणूकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान, एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना आज वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत घडली आहे. सागर नामदेव देशमुख (वय 33, मूळ गाव - वारंगुसी, ता. अकोले, जि. नगर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणुन कार्यरत होते. वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्र. 3 म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
शिक्षक सागर देशमुख हे पानशेत कडून कादवे मार्गे दुचाकी क्रमांक एमएच 14-सीबी 7314 ने वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत होते. यावेळी धानेप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एमएच-12 एमव्ही 5190 या क्रमांकाच्या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. दरम्यान, त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास यांनी दिली.
हेही वाचा - बीड : शेतात चक्कर मारुन येतो म्हणत शेतकऱ्याने घर सोडलं, सकाळी समोर आली भयानक घटना
तर वेल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे म्हणाले, अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख यांचा तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bike accident, Pune accident, Pune news