पुणे, 18 ऑक्टोबर : मुंबई बंगळुरू महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. भरधाव नॅनो कारने अचानक पेट घेतला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई बंगळुरू महामार्गावर आज दुपारी वारजेजवळ ही घटना घडली. साताऱ्याहून एक कुटुंब टाटा नॅनो कारने मुंबईच्या दिशेनं जात होते. वारजे पुलाजवळ ही कार पोहोचली असता नॅनो कारच्या पाठीमागून धूर येत होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाने गाडी थांबवण्यास सांगितले.
मुंबई-बंगलोर हायवेवर साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या नॅनो कारला अचानक आग लागली. आगीत ही गाडी जळून पूर्णपणे खाक झाली pic.twitter.com/zbb7Mi06RW
त्यामुळे नॅनो कारमधील पती, पत्नी, दोन मुलं गाडीतून लगेचच उतरले. काय घडले नेमके याची पाहणी करत असताना अचानक कारने पेट घेतला. आणि काही क्षणांत आगीच भडका उडाला. वेळीच कारमधील कुटुंब बाहेर पडल्यामुळे अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचला. स्थानिक लोकांनी कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना अपयश आले.
नॅनो कारला आग लागल्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पण, तोपर्यंत नॅनो कारही पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मुंबईतील अंधेरीमध्ये कार जळून खाक
दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील अंधेरी परिसरात रात्री उशिरा एका कारनं अचानक पेट घेतला. भररस्त्यात कारमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला. सुदैवाने या दुर्घटनेदरम्यान कार चालक थोडक्यात बचावला. कारनं पेट घेताक्षणी कार चालकाला आपला जीव वाचवण्यात यश आलं आहे.
अंधेरी परिसरात गाडीनं पेट घेतला. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत गाडी जळून खाक झाली. कारमध्ये आग लागताच चालकाला बाहेर पडण्यात यश आलं आहे. pic.twitter.com/wthqYpxqOd
आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी होती. आगीत कार जळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.