तमाशाचा फड गाजवणारा तरुण 'खलनायक' काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्र हळहळला!

तमाशाचा फड गाजवणारा तरुण 'खलनायक' काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्र हळहळला!

यात्रा-जत्रांमधून मनोरंजनाच्या माध्यमातून खलनायक अशी ओळख मिळवणारा एक तमाशा कलावंत कोरोनाचा बळी ठरला आहे.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus) फटका सर्वच क्षेत्रातील नागरिकांना बसत आहे. या व्हायरसचा संसर्ग होऊन अनेकांचा जीव जात असताना आता कलाकार सुद्धा बळी पडत आहेत. अवघ्या महाराष्ट्रात गाव खेड्यात यात्रा-जत्रांमधून मनोरंजनाच्या माध्यमातून खलनायक अशी ओळख मिळवणारा एक तमाशा कलावंत कोरोनाचा बळी ठरला आहे.

तमाशा क्षेत्रातील तरुण खलनायक दत्ता नेटके पेठकर यांचे आज पहाटे पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ इथे निधन झाले. दत्ता नेटके यांनी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य मंडळ, भिका-भीमा सांगवीकर लोकनाट्य मंडळ यासारख्या मोठ्या तमाशा फडात अनेक वर्ष काम केलं आहे.

नेटके यांनी तमाशात वगनाट्यतील खलनायकाच्या भूमिका सादर केल्या होत्या. तमाशा रसिकांवर अधिराज्य निर्माण करणारा युवा खलनायक व तडफदार भूमिका सादर करणारा कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. तमाशा क्षेत्रात प्रत्येक फडात आपले स्वतःचे अस्तित्व ठेवून त्यांचे वर्तन होते. याशिवाय कधी हलगी, तर कधी सरदार असं स्मरणात राहणारं काम त्यांनी केलं.

हेही वाचा - एका दिवसात जवळपास दोन लाख जणांना लागण, देशातील कोरोना स्थिती विदारक!

कलाकार म्हणून दत्ता नेटके तमाशा क्षेत्रामधील मागील पंचवीस-तीस वर्ष कार्यरत होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून तमाशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. तमाशा कलेची आवड होती, परंतु घराण्याला तमाशा क्षेत्राचा कुठलाही वारसा त्यांना लाभला नव्हता. तमाशा क्षेत्रातल्या वगनाट्यातील भूमिकांना न्याय देण्याचं काम त्यानी केले. दत्ता नेटके यांनी तमाशा क्षेत्रामध्ये प्रवेश केला तो इयत्ता आठवी पास झाल्यानंतर.

तमाशा फडातील त्यांचा प्रवेश झाला तो दत्तोबा, तांबे शिरोलीकर, त्यानंतर रामचंद्र वाडेकर ,मंगला बनसोडे, मालती इनामदार, रघुवीर खेडकर , भिका भीमा सांगवीकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, या मोठ्या तमाशा फडामधून त्यांनी काम केली. तमाशा क्षेत्रातील संध्या नावाच्या नृत्यांगणा सुद्धा प्रसिद्ध होत्या आणि त्यांचा त्यांनी पत्नी म्हणून स्वीकार करून एकत्रित नवरा-बायकोने या कलेच्या क्षेत्राला वाहून घेतले होते. त्यांच्या मागे पत्नी संध्या, शिवम मुलगा असा परिवार आहे.

तमाशा क्षेत्रातील बापू बिरू वाटेगावकर, तांब्याचा विष्णू बाळा पाटील यासारख्या वगनाट्यातील भूमिका त्यांच्या गाजल्या. महाराष्ट्राच्या रसिकांच्या स्मरणात राहिल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तमाशा रसिकांवर ती शोककळा पसरली आहे.

कोरोनाने त्यांच्यावर घाला घातला आणि तरुण तडफदार खलनायकाला महाराष्ट्रातला रसिक आज पोरका झाला, अशी भावना अनेक अनेकांनी व्यक्त केली आहे. राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्था नारायणगाव, राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ महाराष्ट्र राज्य, जुन्नर आंबेगाव खेड मुळशी मातंगस्पीक या सर्वांच्या वतीने नेटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Published by: Akshay Shitole
First published: April 15, 2021, 3:16 PM IST

ताज्या बातम्या