पुणे, 26 जून: मागील काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona cases) कमी होत असली तरी अद्याप कोरोना विषाणूचा धोका कमी झाला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यात देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट (Corona virus 3rd wave) येण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) मोहिम राबवणं आवश्यक आहे. मागील काही काळापासून देशात लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.
सध्या देशात सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हँक्सिन आणि रशिया देशात विकसित झालेली स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशींना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचं वितरण केलं जात आहे. पण अनेक ठिकाणी अजूनही लशीचा तुटवडा जाणवत आहे. यानंतर आता स्पुतनिक व्ही ही लसही देशात दाखल झाली असून याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही या लशीचे 600 डोस दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रात स्पुतनिक लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला आहे. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका 36 वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस देण्यात आली आहे. ही लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या एका कर्मचाऱ्याला दिली आहे. 28 जूनपासून पुणेकरांना स्पुतनिक व्ही ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे. पण ही लस घेण्यासाठी कोविन अॅप आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-Delta Plus नं वाढवली चिंता; केंद्रानं 8 राज्यांना पत्र लिहून केलं अलर्ट
रशियानं विकसित केलेल्या स्पुतनिक लशीच्या दोन डोसमधील अंतर 21 दिवस निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुतनिक व्ही लशीचा दुसरा डोस 21 दिवसानंतर घ्यावा लागतो. स्पुतनिक व्ही लशीच्या एका डोसची किमंत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटनं या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. ही लस कोरोनाविरुद्ध जवळपास 92 टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.