पुण्यातील शेतकरी पुत्रानं शेतातचं साकारला शनिवारवाडा; मुक्या प्राण्यांच्या बचावासाठी बनवलं हक्काचं घर

पुण्यातील शेतकरी पुत्रानं शेतातचं साकारला शनिवारवाडा; मुक्या प्राण्यांच्या बचावासाठी बनवलं हक्काचं घर

पुण्यातील एका व्यक्तीनं आपल्या बैलांच्या प्रेमापोटी आणि शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणून एक आकर्षक किल्ला तयार केला आहे. त्यांनी बैलांचं आणि घोडीचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी एक किल्यारुपी भक्कम मांडव तयार केला आहे.

  • Share this:

पुणे, 07 एप्रिल: पुण्यातील एका व्यक्तीनं आपल्या बैलांच्या प्रेमापोटी आणि शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणून एक आकर्षक किल्ला तयार केला आहे. त्यांनी बैलांचं आणि घोडीचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी एक किल्यारुपी भक्कम मांडव तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी या मांडवावर आकर्षक बुरुज, कमान, कमानीवर फडकणारा भगवा झेंडा आणि सोबतीला चमचम करणाऱ्या ढाली आणि तलवारी लावल्या आहेत. एवढंचं नव्हे तर दर्शनी भागात शिवाजी महाराजांचा पुतळाही उभा केला आहे. हा मांडव पाहिल्यानंतर कोणालाही एखाद्या चित्रपटाच्या  शुटींगसाठीचा देखावा वाटेल. पण त्यांनी हा नजारा केवळ आपल्या बैलांसाठी उभारला आहे.

सध्या राज्यातलं तापमान वाढत आहे. या वाढत्या तापमानापासून मुक्या प्राण्यांचा बचाव व्हावा. यामुळे संबंधित शेतकऱ्यानं कडब्यापासून मांडव तयार केला आहे. हा अनोखा मांडव तयार करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव दिलीप म्हातारबा पवळे असून ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील रहिवसी आहेत. या मांडवाला त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्याचा लुक दिल्यानं परिसरात पर्यटक गर्दी करत आहेत.

आपल्या बैलांचं बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावं, या कल्पनेतून साकारलेला हा मांडव परिसरातील शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. मागील 24 वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपसला असून  आतापर्यंत अनेक किल्यांच्या प्रतिकृती त्यांनी आपल्या शेतात उभारल्या आहेत. ही शनिवारवाड्याची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यासाठी त्यांच्या घरातील सर्वांनी मदत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासोबतच येणाऱ्या पिढीला महाराजांची इतिहास सांगण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न आहे.

या मांडवाची लांबी 59 फूट, रुंदी 20 फुट तर उंची 11 फूट एवढी आहे. कडब्याच्या पेंढ्या आणि बांबुचा वापर करून हा मांडव बनवला असून त्यासाठी 700 पेंढ्या कडबा लागला. कडब्याचा दर शेकडा 3800 ते 4000 रुपये असा आहे. त्यामुळे त्यांना हा मांडव तयार करण्यासाठी एकूण 28 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे. पवळे यांच्याकडे 3 बैलं आणि 1 घोडी असून  त्यांच्यासाठीच हा मांडव उभारण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 7, 2021, 7:22 PM IST

ताज्या बातम्या