पुणे, 04 फेब्रुवारी : कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अखेर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. पण, मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली नाही. 'भाजप नेतृत्व हे टिळक कुटुंबीयांच्या पाठिशी आहे, ते पक्षात कायम राहतील' अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार का बदलावा लागला, याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
(kasaba bypoll election : टिळकांच्या वाड्याला नकार, कसब्यातून भाजपकडून नवीन उमेदवार जाहीर)
शुक्रवारी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. भाजपचे नेृतत्व हे त्यांच्या पाठिशी आहे. ते पक्षातच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे, असं पाटील म्हणाले.
टिळक कुटुंबीयांची शु्क्रवारी रात्री भेट घेतली. त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला आहे. कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ता केलं आहे आणि टिळक कुटुंबियांसोबत आम्ही सोबत आहोत. आगामी काळामध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल. कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर विरोधक ही पोटनिवडणूक बंद करतील, असा कोणताही प्रस्ताव नव्हता. त्यांची वेगळी गणितं दिसत आहेत, म्हणून निर्णय घेतला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
(चिंचवडमध्ये भाजपने दिला वहिणींना मान, भावाला उमेदवारी नाकारली!)
तसंच, अपेक्षेनुसार अश्विनी जगताप आणि हेमंत रासने यांची नाव केंद्रातून घोषित झालेली आहे. केंद्राचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांना विधानसभेत जाण्याची संधी दिली. दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचे पती आणि मुलाला पक्षात योग्य ते स्थान दिलं जाईल तसं अश्वस्त केलं आहे, असंही पाटील म्हणाले,
जगताप कुटुंबात कोणताही वाद नव्हता, विनाकारण चर्चा केली गेली. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या मुलाने जी पोस्ट केली, त्यातून वाद नव्हता हे स्पष्ट झालं आहे. शंकर जगताप हे चिंचवडचे प्रमुख असतील, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: चंद्रकांत पाटील