मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा', सिंधुताई सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

'मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा', सिंधुताई सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

'माझ्या लेकरांनी माझी काळजी घेतली, माझ्या लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्यासाठी हा पुरस्कार अर्पण करते'

'माझ्या लेकरांनी माझी काळजी घेतली, माझ्या लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्यासाठी हा पुरस्कार अर्पण करते'

'माझ्या लेकरांनी माझी काळजी घेतली, माझ्या लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्यासाठी हा पुरस्कार अर्पण करते'

पुणे, 26 जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 'हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास पुरवण्यासाठी आहे, मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा', अशा शब्दांत सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे.  पद्मश्री पुरस्कारामध्ये फासेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे.

यामध्ये 7 जणांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. (Padma Award announced) पद्मभूषण या विभागात महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे.

'या पुरस्कारासाठी मी कधी जगले नाही. पुढे जात राहिले काम करत राहिले, माझ्या लेकरांनी माझी काळजी घेतली, माझ्या लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्यासाठी हा पुरस्कार अर्पण करते' अशी भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

'आजपर्यंत फाटलेले आयुष्य मी शिवत शिवत आले, टाके घातले तुम्ही सर्वांना दोरा दिला. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. लाखो लेकरांना पदरात घ्यायचे आहे, तरच मला सुख मिळणार आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही सर्व जण गणगोत व्हा, मायी तुमची आभारी आहे, असं म्हणत सिंधुताईंनी केंद्र सरकारचे आभार मानले.

केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये  मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण, तर दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा यावेळी सन्मान केला जातो. यामध्ये मरणोत्तरही पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षीही सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Republic Day