पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी, डॉक्टरने केली महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी, डॉक्टरने केली महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

पुणे, 10 ऑगस्ट : सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना उघड झाली आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरा इथं एका डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना घडली असून सदर डॉक्टरवर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर येथील सदर पीडित महिला आजारी असल्याने तिने काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. मात्र प्रकृतीमध्ये काही फरक पडत नसल्याने पीडितेच्या वडिलांनी सदर महिलेला न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरू असताना रविवारी रात्रीच्या वेळेस डॉ.रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणी करायची आहे, असं सांगून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं.

सदर महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले. यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा त्यानंतर पाहू असं म्हटलं असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस, थांब.. असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त करत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

यावेळी महिलेने डॉक्टरांना ढकलून देत घाबरून डॉक्टरांच्या केबिन बाहेर धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत सर्व माहिती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत घटनेबाबत पोलिसांना माहिती देत याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली,

पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 10, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या