मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'स्वबळावर सत्तेत येणार असाल तर शुभेच्छा', संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

'स्वबळावर सत्तेत येणार असाल तर शुभेच्छा', संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संजय राऊतांनी काँग्रेसला टोलाही मारला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 05 जून: शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्यात अनलॉकसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य केलं आहे. तसंच अनलॉक होतेय ही चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी संजय राऊतांनी काँग्रेस (Congress) ला टोलाही मारला आहे. काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असा टोला राऊतांनी काँग्रेसला मारला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

काँग्रेसला टोला

काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छा, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला टोला मारला आहे. स्थानिक पातळीवर आघाडीनं एकत्र लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय असेल. पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावं आम्ही पाठिंबा देऊ, असंही संजय राऊत म्हणालेत.

हेही वाचा- अनलॉकच्या टप्प्यात मुंबई नेमकी कोणत्या स्तरात?, महापौरांनी केलं स्पष्ट

विरोधकांवर निशाणा

या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे.

राऊत यांनी फडणवीस यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना टोमणा मारला आहे. प्रभाग तोडफोडीचा आरोप करणाऱ्या भाजपने गेल्यावेळी पुण्यात तेच केलं असं म्हणत पाठीत खंजीर खूपसणं ही सेनेची संस्कृती नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच चंद्रकांत दादा म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत त्यांनी बोलताना भान ठेवावं, असा सल्ला राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

हेही वाचा- ''...तर मग आमच्या काँग्रेसला शुभेच्छा'', संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

जिथं सेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न होतील तिथं तिथं मी जाणार असं म्हणत आगामी पुणे मनपात सेना किंग किंवा किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडेही आमचं लक्ष असल्याचंही संजय राऊत सांगायला विसरले नाहीत. महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित असून राज्यातलं आघाडी सरकार नीट चाललं असल्याचंही ते म्हणालेत.

अनलॉकवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

अनलॉक होतेय ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तो निर्णय घेतला आहे. जनतेला त्रास न होता नियमांची आखणी केल्याचंही राऊत म्हणालेत. तसंच विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरुन थोडीफार गडबड झाली. पण महाविकास आघाडीत हे असं होतं राहतंच. पण सरकार मजबूत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Congress, Sanjay raut, Shivseana