शिरूर, 5 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे खासगी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना मानवी कवटी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सणसवाडी येथे टीजीपीएल या खासगी गॅस कंपनीचे पुणे-नगर महामार्गवर सीएनजी गॅस पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असतानाच जेसीबी चालकाला मानवी कवटी आढळून आली. त्यांनी तात्काळ शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित ठिकाणी अधिक खोदकाम केलं असता मानवी कवटीसह हाताची हाडे व हाडांचा चुरा आढळून आला.
पोलिसांनी मानवी कवटी व हाडाचे तुकडे व चुरा ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवून दिला आहे. मात्र, हे अवशेष कोणाचे व या घटनेमागे घातपात आहे का? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - बाईकवरून जाताना वाटेतच बिबट्याने दोघांवर चढवला हल्ला; पुणे जिल्ह्यातील घटना
दरम्यान, औद्योगिक परिसरामध्ये परप्रांतीय लोकसंख्या मोठ्या संख्येने असल्यामुळे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील अहवाल लवकरच पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत असणाऱ्या शिक्रापूर पोलीस स्टेशनला मिळेल, असा विश्वास पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वर्तवला जात आहे.
साधारणपणे ही दहा पंधरा वर्षांपूर्वीची माणसाची कवटी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर घटनेबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत याचा तपास सुरू असून लवकरच याबाबतची माहिती समोर येईल, असा विश्वास शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.