पुणे, 01 मार्च : पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी 'माझी हत्या होणार आहे, जे या प्रकरणातील आरोपी आहे तेच माझी हत्या करतील', असा गंभीर दावा केला आहे.
शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात भेटीसाठी आल्या होत्या. पण यावेळी पोलीस उप आयुक्तांची भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे.
'माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे', असा दावा शांताबाई राठोड यांनी केला आहे.
'मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परळीला गेल्यानंतर तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला काही धोका झाला किंवा मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही, अशा आरोपींची नावं मी तृप्ती देसाई यांच्याकडे दिली आहे', असंही शांता राठोड म्हणाल्या.
'पाच कोटी रुपये दिलेले आहे म्हणून तिच्या आई वडिलांचे तोंड बंद झाले आहे. पूजाचे आणि माझे चांगले रिलेशन होते. परळीतील सीसीटीव्ही मिळावं यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्याचा या प्रकरणात कोणताही संबंध नाही. जर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाहीतर मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे, असंही शांताबाई राठोड यांनी सांगितलं.
पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न म्हणून तृप्ती देसाई यांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक लगड यांना कारवाई करायची नाही, सामान्य माणसावर लवकर कारवाई होते. पण या प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही. पोलिसांना सगळं माहिती असतांना गुन्हा दाखल होत नाही, अशी टीकाही शांताबाई राठोड यांनी केली.
पूजाचे आई-वडील अत्यंत दबावाखाली आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजाचे आई वडिलांना भेटले तसे शांता राठोड यांनाही भेटावे हे सुद्धा त्यांचे नातलग आहेत, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.
'आम्हाला भेटायचं नव्हतं म्हणून वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी मिटिंग असल्याचं सांगितलं. परळीत कोणत्या कोणत्या गाड्या आल्या याची माहिती समोर यायला हवी. चार पाच दिवसांत मुख्यमंत्री यांची भेट घेऊ', असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.