Home /News /pune /

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी

दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला मित्र व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.

पुणे 07 जानेवारी : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरलं. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लानी आज असंख्य कुस्ती शौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत शैलेश शेळकेला अर्थातच उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला मित्र व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही चांदीची मानाची गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. खासदार श्रीनिवास पाटील आणि श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, सुनील शेळके,  नानासाहेब नवले आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी आगामी कुस्तीवरील ‘केसरी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर व अभिनेता विराट मडके तसेच दिग्दर्शक सुजय डहाके उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.   पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्यांचा सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले असून हीच खरी कुस्तीची किमया आहे. यंदाच्या नेटक्या आयोजनाचेदेखील पवारांनी कौतुक केले. बाळासाहेब लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे. आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Maharashtra kesri, Sharad pawar

पुढील बातम्या