Serum Fire : आग पूर्ण विझल्यानंतर दिसले 5 मृतदेह, काय म्हणाले पुण्याचे महापौर? पाहा VIDEO

Serum Fire : आग पूर्ण विझल्यानंतर दिसले 5 मृतदेह, काय म्हणाले पुण्याचे महापौर? पाहा VIDEO

सीरमला इन्स्टिट्यूटला लागलेली आग फार मोठ्या गंभीर स्वरूपाची नव्हती, ती तासाभरात आटोक्यातही आली, पण वरच्या मजल्यावर असलेल्या पाच लोकांची माहितीच न मिळाल्याने घात झाला.

  • Share this:

पुणे, 21 जानेवारी: कोरोना लशीची निर्मिती करत असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला दुपारी आग लागली. काही क्षणांत आग भडकली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने हजर झाले आणि तासा-दीड तासांत आग आटोक्यात आली. पण आग पूर्ण विझेपर्यंत वरच्या मजल्यावर अडकलेल्या पाच लोकांना पत्ताच लागू शकलेला नव्हता. त्याचमुळे जीवितहानी झाली, अशी माहिती घटनास्थळाची पाहणी करून आलेल्या पुण्याच्या महापौरांनी दिली.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सीरम इन्स्टिट्यूटला संध्याकाळी भेट दिली. तिथून बाहेर पडल्यानंतर News18lokmat.com साठी फेसबुक लाइव्हद्वारे बातचित करताना त्यांनी पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पहिल्यांदा व्यक्त केली होती.

नेमकं काय झालं?

हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली. अंदाज असा होता की 4 लोक अडकले आहेत. ही माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. त्यांनी या लोकांची तातडीने सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरू झालं. या इमारतीत वरच्या मजल्यावर कोणी असल्याची माहितीच नव्हती. हा मजला जळून खाक झाला होता. आग विझल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचले असता 5 जण मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं. मृतदेह ससून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहेत.

ही आग वेल्डिंगच्या कामादरम्यान लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशभराला कोरोना लस पुरवण्याची व्यवस्था सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. फक्त देश नाही, तर जगाचं लक्ष या संस्थेनं तयार केलेल्या कोरोना लशीकडे आहे. त्यातच या आगीची बातमी आणि जीवितहानी झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

लसनिर्मितीवर परिणाम होणार का?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही. आग नवीन इमारतीच्या ठिकाणी लागली आहे. त्यामुळे या आगीचा लसनिर्मितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटद्वारे सांगण्यात येत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या BCG लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तेव्हा या इमारतीचीसुद्धा पाहणी केली होती.

First published: January 21, 2021, 6:29 PM IST

ताज्या बातम्या