पुण्यात वाजली शाळेची घंटा, 1 फेब्रुवारीपासून शाळा उघडणार!

पुण्यात वाजली शाळेची घंटा, 1 फेब्रुवारीपासून शाळा उघडणार!

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड 19 साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.

  • Share this:

पुणे, 22 जानेवारी : कोरोनामुळे (Corona) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची (School) दार आता उघडली जाणार आहे.  पुण्यात पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. दरम्यान पुणे शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी 24 डिसेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. महापालिकेकडून यासंबंधी अधिकृत पत्रक काढण्यात आले आहेत.

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीचे वर्ग दिनांक 1 फेब्रुवारीपासून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मार्गदर्शक सूचना आणि अटींचं पालन करत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड 19 साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणं आवश्यक असणार आहे.

याआधीही महापालिकेकडून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुण्यात अचानकपणे वाढली होती. एवढंच नाहीतर कोरोनाचा नवीन विषाणू ब्रिटेनमध्ये सापडला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र, जवळपास वर्षभर पूर्ण होत आल्यामुळे शाळा सुरू केल्या जाणार आहे.

Published by: sachin Salve
First published: January 23, 2021, 8:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या