Home /News /pune /

पुण्यात बिघाडी! आमदार दिलीप मोहिते पाटलांचा बंदोबस्त करा, अन्यथा..! संजय राऊत यांचा आजित पवारांना इशारा

पुण्यात बिघाडी! आमदार दिलीप मोहिते पाटलांचा बंदोबस्त करा, अन्यथा..! संजय राऊत यांचा आजित पवारांना इशारा

Sanjay Raut Press conference पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल असा इशारा राऊत यांनी दिला.

    पुणे, 04 जून : पिंपरी व खेडमध्ये (Pimpri Khed) पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडी सरकारच्याच (MVA) गृहखात्यावर टीका केली आहे. प्रतिष्ठित शिवसैनिकांना आणि सभापतींना गुन्हेगारांचा काळा बुरखा घालून उभं केलं. पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुत्रानं गोळीबार केला, त्याला काळा बुरखा घातला होता का? असा प्रश्न राऊतांनी केला. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा (Dilip Mohite Patil) बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी करावा, नाहीतर हा विषय शिवसेनेकडं सोपवावा, असा इशारा त्यांनी दिला. पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत सदस्यांच्या पळवापळवीनंतर संजय राऊत यांनी खेड तालुक्यातल्या राजगुरूनगर इथं पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच, ठरावाच्या बाजुनं मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत थेट खेड शिवसेना कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.  खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल अशा शब्दात राऊत यांनी मोहितेंचा समाचार घेतला. पंचायत समितीच्या सदस्यांना दहशतीनं पळवून नेलं. त्यांच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे, असं संजय राऊत म्हणाले. (वाचा-पंढरीची ओढ! सांगाल ते नियम पाळू, पण पायी वारीची परवानगी द्या-वारकरी संप्रदाय) अजितदादा लक्ष द्या.. खेडला जे घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे पाहू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल असा इशारा राऊत यांनी दिला. दिलीप मोहिते पाटील यांच्याकडं अजित पवारांनी लक्ष द्यावं. त्यांना हे शक्य होणार नसेल तर त्यांनी हा विषय शिवसेनेकडे सोपवावा. शिवसेना काय ते बघून घेईल, असंही संजय राऊत म्हणाले. (वाचा-...तेव्हापासून झोपेतून जागा होतो आणि पाहतो सरकार पडलं आहे का: अजित पवार) आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत शिवसेनेचे जे पंचायत समिती सदस्य गेले किंवा पळवून नेले त्यांचा बंदोबस्त आम्ही करु. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वारु नेहमीच उधळलेला असतो. पण शिवसेनेनंही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही काय करु शकतो हे खेडमध्ये दाखवून देऊ. हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांना सुनावलं. नेमकं काय आहे प्रकरण? खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर काँग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. पण सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झाली. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलं. सर्वपक्षीय 14 पैकी 11 सदस्यांसह सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती आहे. त्यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडं राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, Khed, Pune, Pune news, Sanjay raut

    पुढील बातम्या