पुणे, 12 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटना चर्चेचा विषय झालेल्या असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात वाळू व्यवसायिक जखमी झाला आहे.
वानवडी परिसरात वाळू व्यवसायिक असणारा मयुर हांडे (वय 32) हा तरूण आपलं काम आटपून श्रीराम चौकातून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी मयुर हांडे याने प्रसंगावधान राखत पहिली गोळी झाडल्यानंतर लगेच हल्लेखोराला धक्का देत तिथून पळ काढला. त्यामुळे मयुरने कसाबसा आपला जीव वाचवला.
हल्ल्याचा डाव अर्थवट राहिल्यानंतर अज्ञात आरोपी तिथून फरार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी मयुर हांडे हे वाळू व्यावसायिक आहेत. बांधकामासाठी लागणारी वाळू पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मयुर हांडे याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यात नेमकं चाललंय काय? पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना pic.twitter.com/1wrYSw59Ek
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2020
दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयुर हांडे याच्यावर हल्ला करणारा आरोपी नेमका कोण आहे आणि त्याने हे कृत्य का केलं? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यात नेमकं चाललंय काय?
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, मारामारी, गँगवॉर यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.