रायचंद शिंदे, प्रतिनिधी
पुणे, 1 फेब्रुवारी : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत देखील संभाजी भिडे यांनी मांडले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका. जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांना अश्रृ अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
वाचा - Khed Shivapur Toll : खेड शिवापूर टोलचे भूत पुन्हा पुणेकरांच्या मानगुटीवर, स्थानिकांना मोठा फटका
शिवप्रतिष्ठानची गटकोट मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनमाणसांपर्यत पोहचावा यासाठी शिवप्रतिष्ठानचे राज्यभरातुन 50 हजार धारकऱ्यांनी श्री क्षेत्र भिमाशंकर ते किल्ले शिवनेरी असा 25 किलोमीटर डोंगरकड्यावरुन तीन दिवसांचा पायी प्रवास केला. या गडकोट मोहिमेचा समारोप किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी झाला. किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी धारकऱ्यासमेवत भाजपचे दोन आमदार आणि संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जुन्नर शहरातून मिरवणुकीला सुरुवात झाली. यानंतर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या या मोहिमेत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यामुळे धारकऱ्यांच्या माहिमेला राजकिय रंग सुद्धा आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.