अद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे
इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे सध्या सतत चर्चेत आहेत. 9 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील राजीव गांधी यांची ओळख बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने करून दिल्याने मोरेंना काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मोगलांचा इतिहासच गायब झाल्याचा मुद्दा पुढं आलाय. म्हणजे अकबराचा कालखंड, कुतुबमिनार, ताजमहल ही वास्तुकला हे गायब झालंय. एकूण अत्यंत त्रोटक स्वरूपात मोगलांचा इतिहास मांडण्यात आलाय. विशेष म्हणजे इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांनीच याबद्दल आक्षेप घेतलाय. यावर सदानंद मोरे यांनी मात्र मराठयांच्या इतिहासावर अन्याय झाला, त्याला स्थान दिलंय हे सांगताना महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मोगलांचा नाही तर मराठ्यांचा इतिहास आहे, याकडे लक्ष वेधताना तो तसाच शिकवला पाहिजे, असं ठाम प्रतिपादन केलं.
आतापर्यंत केंद्रस्थानी मोगलांचा इतिहास होता आता आम्ही एकमताने मराठ्यांचा इतिहास केंद्रस्थानी आणून राज्यातल्या विद्यार्थ्यांनी जगाचा इतिहासाचा अभ्यास करताना मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या नजरेतून बघितलं पाहिजे, असा आपला दृष्टीकोण असल्याचं स्पष्ट केलं. केंद्राच्या 'एनसीईआरटी'च्या 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गाडला गेला, याबद्दल कुणी बोलत नाही असा सवाल करत मोरे यांनी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटोही नाही, तलवार, वाघनखे यांची चित्रे नाहीत पण मोगल आणि इतर राजांची छबी, हत्यारांची चित्रे आहेत हे सांगताना नादीर शहा आहे, रजिया सुल्तान आहे. मग संभाजी महाराज, ताराराणी का नाहीत असं विचारत राज्यातील आमदार, खासदार यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे अशी मागणी केली.
कुतुबमिनार, ताजमहल या हेरिटेज वास्तूंबद्दल 10 वीच्या पुस्तकात विद्यार्थी वाचतील, त्यांनी 7 वीच्याच पुस्तकात वाचलं पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे आहे, असं म्हटलंय. आपण संकुचित नाही तर व्यापक दृष्टिकोन ठेवलाय, हे सांगत बालभारतीची इतिहास विषय समिती स्वायत्त आहे, कुणा सरकार, विचारसरणीच्या प्रभावाखाली काम करत नाही, हा अस्मितेचा मुद्दा नाही, प्रतिक्रिया नाही तर नैसर्गिक मांडणी आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं. एकूणच सदानंद मोरे अध्यक्ष असलेल्या समितीकडे 3 री ते 12 वीपर्यंत इतिहासाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम आहे.
8 वी 10 वीची पुस्तके पुढल्या वर्षी येतील त्यामुळे आणखी काय काय इतिहास पुढं येतो, कुठला गाळला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या इतिहासाचा, त्यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा चर्चेत आल्यानं वादाला आपसूक फोडणी मिळाली आहे. इतिहासाचं पुनर्लेखन, खरा इतिहास, खोटा इतिहास, ब्राह्मणी इतिहास हे मुद्दे गाजत राहणार, चर्चेत राहणार हे मात्र नक्की
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: सदानंद मोरे