अनिस शेख,(प्रतिनिधी)
देहू,1 डिसेंबर: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तसेच मुंबई-बंगळुरू हायवे वर प्रवाशांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूटणाऱ्या टोळीला देहूरोड पोलिसांनी लोणार (जि.बुलढाणा) येथून गजाआड केले आहे. या टोळीत एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मात्र, टोळीचा म्होरक्या अद्याप फरार आहे.
देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सेंट्रल चौक येथून लिफ्ट देण्याचा बहाणा करून 12 नोव्हेंबरला या टोळीने एका प्रवाशाला त्यांच्या गाडीत बसवले होते. नंतर काही अंतर पुढे गेल्यावर गाडीत बसलेल्या प्रवाशाला मारहाण करत तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळील रोख रक्कम, पिन कोडसह क्रेडिट व डेबिट कार्ड काढून घेतले होते. एवढेच नाही तर प्रवासाच्या डोळ्यावर पट्टी बांधून निर्जनस्थळी सोडून दिले होते. या प्रकरणी पीडित व्यक्तीने चार अज्ञात आरोपींविरुद्ध देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
आरोपींनी प्रवाशांकडून घेतलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांच्यावरून विविध ठिकाणावरून दोन लाख 12 हजार रुपयांची सोने-चांदीचे दागिने तसेच महागडे गॉगल आरोपींनी खरेदी केले होते. या घटनेच्या तपासादरम्यान ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेत चारही आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी थेट बुलढाणा लोणार परिसरात आठ दिवस कसून आरोपींचा शोध घेतला आणि तिथेच त्यांच्या मुसक्या आवळल्या. पवन प्रकाश कडाळे, संतोष अशोक इंगवले, तसेच त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर पोलीस आल्याची कुणकूण लागताच टोळीचा म्होरक्या अविनाश शिंदे हा फरार झाला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून देहूरोड, शिरूर, शिक्रापूर परिसरातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक इंडिका कारसह तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केली आहे. प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील सदस्य हे सराईत गुन्हेगार असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देहूरोड पोलिसांनी वर्तवली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा