अद्वैत मेहता, प्रतिनिधी
पुणे, 04 मे : पुण्यातील तुळशीबागमध्ये असणाऱ्या राम मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांची इतकी मजल वाढली की त्यांनी चक्क देवाच्या अंगावरील दागिनेच चोरल्याचं सांगण्यात येत आहे. मंदिरात असलेल्या रामाच्या आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ तसंच पुजार्याचा मोबाईलदेखील चोराने चोरले.
या संपूर्ण प्रकाराबद्दल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीबागेतील रामाच्या मंदिरात 1 तारखेला सकाळी 7 वाजताच्या सुमारास मंदिरातील पुजारी संकेत मेहेंदळे हे नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यावर पूजा करण्यासाठी नळावर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान चोरी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
साधारण 25 वय असलेल्या तरुणाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन रामाच्या आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ चोरले. या चाळांचं वजन प्रत्येकी 150 ग्रॅम असं दोन्ही मिळून 300 ग्रॅम वजनाचे 11 हजार 400 रुपये किमतीचे चाळ चोरून नेले. तर गाभाऱ्यातील पुजार्याचा मोबाईलदेखील चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलीस चोराचा शोध घेत आहे. देवाच्या पायातील चाळ चोरण्याइतकी चोरांची मजल गेल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर आता मंदिरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराला शोधण्याचं काम सुरू आहे.
VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल