पुणे, 16 जून : भारतात तब्बल अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही, उलट लॉकडाउन खोलताच हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमधील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक रोग प्रतिकारशक्तीचा पर्याय स्वीकारावा का? असाही एक विचार काही जाणकार बोलून दाखवू लागले आहे. पण भारतासारख्या दाट घनतेच्या लोकसंख्येच्या देशाला हे खरंच परवडणारं आहे का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतरही भारतातील कोरोनाची महामारी आकोट्यात येण्याची कोणतीच चिन्हं दिसतं नाहीत. उलट मुंबई, दिल्ली आणि पुणे सारख्या हॉटस्पॉट शहरांमधली कोरोनाची रूग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाचं लसीकरणही आजमितीला तरी कुठेच नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. म्हणूनच आरोग्य क्षेत्रातील काही जाणकार हर्ड इम्युनिटीचा पर्याय स्वीकारण्याबद्दल जाहीरपणे बोलू लागले आहे. पण भारताला खरंच ही परवडणारी आहे का ? हा प्रश्नच आहे. कारण, असं केल्याने भारतात अक्षरशः मृत्यूचं तांडव होऊ शकतं.
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय ?
- हर्ड म्हणजे कळप किंवा समूह
- आणि इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती
- हर्ड इन्युनिटी म्हणजेच समुहाची रोग प्रतिकार शक्ती
कशी तयार होते हर्ड इम्युनिटी ?
1. नैसर्गिक पद्धत
2. लसीकरण
पण, भारतात सध्यातरी हे दोन्ही पर्याय कुठेच नजरेच्या टप्प्यात दिसत नाहीत. कारण, नैसर्गिक पद्धत स्वीकारायची झाली तर भारतासारख्या महाकाय आणि दाट लोकसंख्येच्या देशात मृत्यूचे प्रमाण वाढेल.
भारताला हर्ड इम्युनिटी खरंच परवडेल?
भारतात किमान 60 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊ द्यावा लागेल आणि असं झाल्यास मृत्यूदर अवघा 1 टक्का गृहित धरला तरी
भारतात तब्बल 1.25 कोटी लोक कोरोनाचे बळी ठरू शकतात. आणि कोरोना मृत्यूंचा हा भयावह आकडा भारतासारख्या देशाला अजिबात परवडणारा नाही. अशातच लॉकडाउन दरम्यान कंटेन्मेंट झोनमधील अवघ्या 1 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार होऊ शकल्याचे आढळून आले आहे, साथरोग नियंञण कक्षाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली.
155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील तब्बल सव्वा लाख नागरिकांना दिला रोजगार
'हर्ड इम्युनिटीच्या नैसर्गिक संसर्गाचा पर्याय भारताला परवडणारा नसल्याने मग पर्याय उरतो लसीकरणाचा. पण सध्यातरी कोरोनावर कुठलीच प्रभावी लस समोर आलेली नाही. किंबहुना कोणत्याही साथीच्या रोगावर लस शोधण्यासाठी किमान 18 महिने लागत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसंही मास लेव्हलवरील लसीकरण मोहिमेशिवाय कुठल्याही समुहात हर्ड इम्युनिटी तयार होऊच शकत नाही. भारतात आजवर आपण फक्त गोवर सारख्या साथीच्या रोगावर हर्ड इम्युनिटीद्वारे मात करू शकलो आहोत', अशी माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
जागतिक पातळीवर कोरोनाला अटकाव करण्यासाठी आतापर्यंत फक्त स्वीडन या देशाने हर्ड इम्युनिटीचं धाडस केले आहे. पण त्यावरही जगभरातून टीका होत आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात कोरोनाला संपवण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा पर्याय कुठल्याही परिस्थितीत परवडणारा नाही. पण त्याचबरोबर सततचं लॉकडाउन देखील भारतासारख्या गरीब देशाला आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत घेऊव जावू शकतो. म्हणूनच जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस शोधली जात नाही तोपर्यंत सॅनिटायझरचा वापर वाढवण्यासोबतच फिजिकल डिस्टंट पाळून होता होईल तेवढं स्वतःला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणं एवढाच काय तो पर्याय भारतीयांसमोर उरलेला आहे.
आता हद्द झाली! कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी लोक नदीत टाकताहेत रोज 500 किलो बर्फ
संपादन - सचिन साळवे