Home /News /pune /

सप्टेंबरच्या Flash flood च्या आठवणीने दररोज संध्याकाळी पुणेकरांना भरतेय धडकी! काय सुरू आहे शहरात? काय आहे अंदाज?

सप्टेंबरच्या Flash flood च्या आठवणीने दररोज संध्याकाळी पुणेकरांना भरतेय धडकी! काय सुरू आहे शहरात? काय आहे अंदाज?

पुणेकरांनो पुढचे काही दिवस काळजी घ्या. September Rains चे दिवस आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पावसाने पुणेकरांना महापुराची (Flash floods) झलक दाखवली होती. आता पुन्हा तसंच वातावरण निर्माण होतंय. काय आहे IMD चा अंदाज?

    पुणे, 11 सप्टेंबर : गेले काही दिवस नित्यनेमाने पुण्यात संध्याकाळी मुसळधार पाऊस (pune rain) पडतो आहे. दुपारी ऑक्टोबर हिटसारखा चटका, मग उकाडा आणि पाठोपाठ वाऱ्याबरोबर येणारा गडगडाटी पाऊस हे आता नित्याचं झालं आहे. पावसापाठोपाठ वीज जाणे, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा, झाडं पडल्याने धोका, खड्डे या नेहमीच्या अडचणींचा सामनाही पुणेकर करत आहेत. पण मनात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या पावसाची भीती अजूनही कायम आहे. प्रत्येक संध्याकाळी आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून येतं तेव्हा गेल्या सप्टेंबरचा तो प्रलयकारी (pune flash flood) पाऊस पुणेकरांना आठवतो आहे. गेल्या वर्षी 25 सप्टेंबरच्या रात्री पुण्यात फक्त 4 तासांत असा काही बेभान पाऊस झाला की, असा पाऊस उभ्या जन्मात पाहिला नाही, असं अजूनही पुणेकर सांगतात. या तुफानी पावसाने रस्त्यांचे नाले झाले. या पुरात किमान दोन डझन लोकांचे प्राण गेले. हजारो वाहनं पुरात वाहून गेली. पुढचे कित्येत दिवस घरांमधून, सोसायट्यांमधून आणि झोपड्यांमधून चिखल-गाळ उपसायचं काम सुरू होतं. NDRF च्या जवानांनी अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं म्हणून कित्येक जीव वाचले. गंमत म्हणजे पुण्यातल्या मुख्य नद्यांना नव्हे, तर नाले, ओढे आणि तलावांना पूर आल्याने जवळपास 60 टक्के शहराला जबर फटका बसला. सप्टेंबरमध्ये संध्याकाळनंतर झालेल्या या प्रचंड पावसानं कात्रज तलाव भरून वाहू लागला आणि त्या दबावाने आंबिल ओढ्याची भिंत फुटली. हा ओढा शहराच्या मध्यभागातून एरवी बेमालूमपणे वाहात असतो. इथे एवढा मोठा, कात्रजपासून मुठेपर्यंतचा ओढा आहे याची जाणीवही नव्हती. ती झाली 26 सप्टेंबर 2019 नंतर. अंबिल ओढ्यालगतच्या झोपडपट्टीतच नाही तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. अवघ्या रात्रभरात हाहाकार झाला होता. वाचा पाऊस वाजत-गाजत परतला! जोरदार बॅटिंग सुरू; 2 जिल्ह्यांना orange alert! पुणे शहरातच नव्हे, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा पाऊस झाला आणि ठिकठिकाणच्या नाल्यांना मोठ्या नद्यांचं स्वरूप आलं होतं. ढगफुटी नव्हे फ्लॅश फ्लड अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात पूर आला. साठच्या दशकात खडकवासला धरण फुटलं तेव्हा पुण्यात महापूर आला होता. पुण्याचा नकाशा बदलणारा तो पूर होता. त्यानंतर तेवढ्या तीव्रतेचा नाही पण त्या तीव्रतेची झलक दाखवणारा पूर पुण्यात गेल्या वर्षी आला. त्यात कात्रज तलाव भरून वाहिला. हा flash flood असल्याचं वेधशाळेनं म्हटलं. कमी वेळात तुफानी पाऊस झाल्याने ओढे, नाले भरून वाहिले. पण ही ढगफुटी नसल्याचंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं. कोकणाच्या मानाने पावसाचं प्रमाण कमी होतं, पण तरी पुराची तीव्रता पुणेकरांसाठी खूप मोठी ठरली. कारण ठरली अतिक्रमणं. मनमानी बांधकामांमुळे नाले, ओढे ठिकठिकाणी बुजवले आहेत, तर काही ठिकाणी त्यांचा नैसर्गिक प्रवाह वळवायचा प्रयत्न झाला. निसर्गाच्या एका फटक्याने म्हणूनच पुण्याची वाताहत झाली. कुठल्या भागांना आहे flash flood चा धोका? गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पावसाने शहरातले कात्रज, बिबवेवाडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकार नगर, टांगेवाला कॉलनी, कोंढवा, फातिमा नगर, पर्वती पायथा, वानवडी, दांडेकर पूल, म्हात्रे पुलाचा परिसर, वडगाव धायरी, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रोड, गणेश पेठ नाल्याजवळचा भाग असे अनेक भाग या पुराच्या तडाख्यात सापडले होते. आतासुद्धा कधी असा कमी वेळात तुफान पाऊस झाला, तर या ओढ्याकाढच्या आणि नाल्यांकाठच्या भागांना सर्वाधिक धोका आहे. नदीलगत राहणाऱ्यांपेक्षा ओढ्यालगत राहणं धोक्याचं झालं आहे. काय आहे IMD चा हवामान अंदाज? गेले काही दिवस संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. वादळी वाऱ्यांसह असा पाऊस पुढचे काही दिवसही पडत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडतो, असा इशारा IMD ने दिला आहे. यलो अलर्ट म्हणजे सावध राहा वेधशाळेने जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांनो पुढचे काही दिवस काळजी घ्या. September Rains चे दिवस आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pune rain

    पुढील बातम्या