पुणे, 18 फेब्रुवारी : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुरा कोराने यांनी अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. अधिकारी आणि त्यात ती महिला असेल तर कसा फरक पडू शकतो याचं हे उदाहरण. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात काल रात्री साडे सात वाजेच्या सुमारास कात्रज घाटामध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचा माहिती देणारा निनावी फोन आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुरा कोराने या पोलीस स्टेशनची गाडी बाहेर गेलेली असल्याने स्वतःच्या दुचाकी वरती घटनास्थळी पोहोचल्या.
तिथे गेल्यावर लहान बाळाचा आवाज येत असलेल्या दिशेने त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना दोन दिवसाचं पुरुष जातीचं अर्भक रडताना दिसून आलं आणि तात्काळ त्यांच्यातलं ममत्व जागं झालं. त्यांनी या बाळाला उराशी कवटाळलं आणि काय आश्चर्य बाळ रडायचं थांबलं. मात्र इतक्या थंडीत बाळाची अवस्था खराब झालेली होती. ते थंडीने गारठून गेलं होतं. त्यामुळे तातडीने या बाळाला उपचारांची गरज होती.
हेही वाचा - पुण्यात नवे CORONA HOTSPOTS; पुणेकरांनो सांभाळा नाहीतर...
क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी या बाळाला कपड्यात गुंडाळून पोलीस स्टेशनची गाडी येण्याची वाट न पाहता स्वतःच्या दुचाकीवरच ससून रुग्णालयात यायचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या दुचाकीवरच या बाळाला घेऊन ससून रुग्णालयात गेल्या. रुग्णालयात नेल्यावर बाळाच्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याचे जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्यासह सोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आता दोन दिवस या बाळावर उपचार झाल्यानंतर त्याला महिला बाल कल्याण समितीसमोर घेऊन जाऊन त्याची पुढची व्यवस्था करायची जबाबदारी अजून पार पाडायची आहे, असंही सहाय्यक पोलीस निरीक्षक कोराने यांनी सांगितलं आहे. उपचारानंतर या बाळाला सोफोष संस्थेकडे सोपवले जाईल. मधुरा कोराने यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.