पुणे, 9 ऑक्टोबर : सांस्कृतिक शहर पुण्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. प्रत्येक दिवशी येथून अजब गजब किस्से ऐकायला मिळत आहेत. आता नुकतंच झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पाळीव कुत्रा पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या कुत्र्याचं नाव 'डॉट्टू' असं आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयने कुत्र्याला पळवल्याची तक्रार त्याच्या मालकीणनं केली आहे. वंदना शहा असे मालकीणचं नाव असून त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे 'कृपया आम्हाला मदत करावी' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कुत्रा अचानक झाला बेपत्ता
पुण्यातील कर्वे रोड येथून 7 ऑक्टोबर रोजी शहा दाम्पत्याचा पाळीव कुत्रा अचानक बेपत्ता झाला. आपला कुत्रा कुठेच दिसून येत नसल्याचं लक्षात येत शहा दाम्पत्यानं त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांना अपयश हाती आले. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं असता डॉट्टू त्यांना परिसरातच खेळताना आढळला. त्यानंतर काही वेळानं तो गायब झाला.
...म्हणून आहे डिलिव्हरी बॉयवर संशय
शोध घेतल्यानंतर कुत्र्याचा पत्ता न लागल्यानं शहा दाम्पत्यानं पोलिसात तक्रार केली. शहा यांनी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमधील काही फूड डिलिव्हरी बॉयकडे डॉट्टूची चौकशी केली. त्या डिलिव्हरी बॉयपैकी एकाने कुत्र्याला ओळखलं. असा कुत्रा आपल्या एका सहकाऱ्याकडे असल्याची माहिती एका डिलिव्हरी बॉयने शहांना दिली.
शहा दाम्पत्यानं त्यांच्या कुत्र्यासोबतचा डिलिव्हरी बॉयचा फोटोही पाहिला. यावरून हा डिलिव्हरी बॉय झोमॅटोचा असल्याची माहिती उघडकीस आली. संतोष असं त्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे संतोष डॉट्टूला पळवल्याची कबुलीही शहा दाम्पत्याला दिली. पण कुत्रा परत करण्यास त्यानं टाळाटाळ केली. डॉट्टू गावी पाठवल्याचं कारण त्यानं शहा दाम्पत्याला सांगितलं.
शहा दाम्पत्याकडून मदतची मागणी
संतोष काहीच ऐकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शहांनी त्याला कुत्र्याच्या बदल्यात रोखरक्कम देण्याची तयारी दर्शवली. पण त्यानं काहीही न ऐकताच फोन बंद करून ठेवला. अखेर शहा दाम्पत्यानं झोमॅटोकडेही मदत मागितली. पण आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा