पुणेकरांसाठी बोचरी थंडी अल्पायुषीच; दोन दिवसात बदलणार हवा, दिवाळीत कसं असेल वातावरण?

पुणेकरांसाठी बोचरी थंडी अल्पायुषीच; दोन दिवसात बदलणार हवा, दिवाळीत कसं असेल वातावरण?

मंगळवारी पुण्याचं तापमान 10 अंशांपर्यंत घसरलं होतं.नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच हे निचांकी तापमान नोंदलं गेलं. पण काही दिवसांत बदलू शकतं वातावरण. पाहा Weather forecast

  • Share this:

पुणे, 11 नोव्हेंबर : गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली (Minimum temperature in maharashtra)आणि थंडीची (winter in pune) चाहूल खऱ्या अर्थाने लागली. पुणेकरांची मंगळवार आणि बुधवारची सकाळ तर बोचऱ्या थंडीचीच होती. तापमान 10 अंशांपर्यंत घसरलं आणि नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच किमान तापमान निचांकी नोंदलं गेलं. स्वेटर, मफलर बाहेर आले. पण हा कडाका काही दिवसात कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने (weather forecast pune mumbai) नोंदवला आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, "राज्यात पुण्यासह काही भागात वाढलेला थंडीचा कडाका उद्यापासून काहीसा कमी होत असला तरी उत्तर भारतीयांची दिवाळी मात्र बोचऱ्या थंडीतच जाणार आहे. गेले दोन दिवस पुण्याचं तापमान 12 वरून 10 अंश सेल्सियसपर्यंत घसरलं होतं. पण पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहणार असल्याने तापमान पुन्हा एखाद्या अंशाने वाढणार आहे. याउलट उत्तर भारतातील थंडी मात्र अधिक तीव्र होणार आहे." याचा अर्थ पुढचे काही दिवस पुण्यात कमी बोचरी गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात थंडीचा कडाका वाढल्याचं दिसलं होतं. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान सरारीच्या तुलनेत कमालीचं घटलं होतं. राज्यातलं सर्वांत कमी तापमान बुधवारी परभणी इथे 9.9 अंश सेल्शिय इतकं नोंदलं गेलं. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पुणे आणि नाशिकात पारा 10.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मराठवाड्यातही किमान तापमानात किरकोल घट झाली.

दिवाळीनंतर बदलू शकतं वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 नोव्हेंबरनंतर हवामान बदलण्याची शक्यता आहे. सध्या निरभ्र असणारं आकाश दुपारनंतर अंशतः ढगाळ राहायची शक्यता आहे. यामुळे किमान तापमान वाढू शकतं आणि थंडी पळून जाऊ शकते.

गेल्या 24 तासांत राज्यातल्या प्रमुख हवामान केंद्रात नोंदवलं गेलेलं किमान तापमान

मुंबई (कुलाबा) २२.०, सांताक्रूझ १९.४ रत्नागिरी - १७.३, पणजी (गोवा) १९.३, डहाणू १९.०, पुणे १०.६, जलगाळ ११.६, महाबळेश्वर १२.२, मालेगाव १२.६, नाशिक १०.६, सातारा १२.६, सोलापूर १२.९, उस्मानाबाद -, औरंगाबाद १२.०, परभणी ९.९, नांदेड १३.५, अकोला १२.४, अमरावती १२.७, बुलढाणा १३.२, ब्रह्मपुरी १४.५, चंद्रपूर ११.८, गोंदिया ११.४, नागपूर १२.२, वाशिम १२.०, वर्धा १३.०, यवतमाळ ९.५.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 11, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या