पुणे, 14 डिसेंबर : सकाळी लवकर उठून बाहेर पडायची सवय असेल किंवा उद्या गाडी काढून कुठल्या प्रवासाला निघणार असाल तर आधी हे वाचा. विशेषतः पुणे परिसरासाठी वेधशाळेने इशारा दिला आहे. गेले दोन दिवस झाकोळलेलं आभाळ उद्या खाली उतरणार आहे. पुणे जिल्हा आणि परिसरात सकाळी दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. त्यामुळे पुणेकरांनो सांभाळा!
सध्या महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी हिवाळ्यातच पावसाळी मोसमाचा अनुभव येतो आहे. आज पुण्यात ढगाळ वातावरण होतं. शहरात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊसही झाला. त्यामुळे वातावारणातला गारठा वाढला. मुंबईसह ठाणे आणि कोकण परिसरातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. आता पुन्हा हवामान बदलाचे संकेत देण्यात आले आहेत.
उद्या पुणे वेधशाळेने पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात विरळ धुके पडण्याचा इशारा दिला आहे. काही भागांत दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो म्हणून सावधगिरी बाळगण्याबाबतही वेधशाळेने सूचना दिली आहे.
सकाळी धुकं, दुपारी पाऊस
वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार उद्यासुद्धा पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सोबतच हलक्या स्वरूपाचा पाऊसही कोसळण्याची शक्यता आहे. तापमान 30 अंश राहणार असून पावसाची शक्यता 40 टक्के तर गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता 31 टक्के असेल.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू होता. पालघर-रायगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढचे 48 तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.