Home /News /pune /

गाड्या अडवल्या, चालकांना अमानुष मारहाण, पुण्यात नशेतील तरुणांचा रस्त्यावर राडा

गाड्या अडवल्या, चालकांना अमानुष मारहाण, पुण्यात नशेतील तरुणांचा रस्त्यावर राडा

तीन अज्ञात तरुणांनी दारुच्या नशेत येणारी-जाणारी वाहने आडवत वाहनचालकांना मारहाण केली.

पुणे, 18 मार्च : राज्यासह देशभरात दोन दिवसांपासून होळी (Holi 2022) आणि धुलिवंदनाचा (Dhulivandan 2022) उत्साह होता. या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित आणि विचित्र घटना देखील आज बघायला मिळाल्या. धुलिवंदनाच्या दिवशी मद्यपी आणि काही समाजकंटकांकडून सर्रासपणे लोकांची लूट केली जाते. त्या नराधमांच्या जाचाला बळी पडलेले हतबल नागरीक काहीच करु शकत नाहीत. कारण त्या समाजकंटकांची संख्या ही जास्त असते. सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबतचं हे रडगाणं यावर्षीचं नाही तर दरवर्षीचं आहे. काही ठिकाणी 'बुरा न मानो होली है' असं म्हणत सर्रासपणे चोरी आणि लुटीच्या घटना घडतात. विशेष म्हणजे यावर्षी तर काही घटनांनी परिसीमाच गाठली. पुण्यात सिंहगड रस्त्यावर काही मद्यपी तरुणांनी प्रचंड राडा घातला. त्यांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्या अडवत वाहन चालकांना कारण नसताना मारहाण केली. तशीच काहीशी घटना आज ठाण्यातही घडली. ठाण्यात एका मद्यधुंद असलेल्या तरुणाने पोलिसावर वीट फेकून मारली. पुण्यातलं नेमकं प्रकरण काय? सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तीन अज्ञात तरुणांनी दारुच्या नशेत येणारी-जाणारी वाहने आडवत वाहनचालकांना मारहाण केली. या तरुणांनी नशेत आठ-नऊ वाहनचालकांना मारहाण केल्याने धायरी फाट्यावर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. (30 वर्षांनंतर विद्यार्थ्यानं घेतला सूड : तब्बल 101 वार करत केली शिक्षिकेची हत्या) पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरातील रिक्षा थांब्याजवळ काही तरुण दारुच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून मारहाण करत होते. यामध्ये तरुणांनी काही दुचाकीस्वरांना अडवून मारहाण केली. त्यानंतर नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला अडवून रस्त्याच्या बाजूला पडलेल्या सिमेंट ब्लॉकने गाडीची तोडफोड केली. तसेच चालकाला गाडीच्या बाहेर ओढून मारहाण केली. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत चालकाने कसाबसा आपला जीव वाचवत धायारीच्या दिशेला निघून गेला. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा एका दुचाकीस्वाराला अडवून त्याला हेल्मेटने मारहाण केली. ठाण्यात पोलिसावर हल्ला दुसरीकडे ठाण्यातही अशीच काहीशी घटना घडली आहे. एका मद्यधुंद तरुणाने थेट पोलिसावर हल्ला केला. संबंधित घटना ही माजिवाडा पुलाजवळ घडली. पुलाजवळ पोलीस थांबले होते. पोलिसांनी आरोपीची गाडी अडवली. ते ड्रंक अँड ड्राईव्हच्या तपासणी करत होते. यावेळी तरुणाने पोलिसाच्या डोक्यात वीट घातली. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या