पुणे, 12 डिसेंबर : पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या राहत्या घरातून 18 लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी त्यांच्या जाऊ ममता दीपक मिसाळ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
लग्नात घालण्यासाठी काढलेले दागिने बेडरुमच्या तिजोरीवर ठेवले असता चोरण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,फिर्यादी ममता मिसाळ या वानवडी येथील फेअर रस्त्यावरील दोन नंबरच्या बंगल्यात राहतात. त्यांच्या सोबत पती, मुले आणि जाऊ आमदार माधुरी मिसाळ व त्यांची दोन मुले असे एकत्र राहतात.
बंगल्यामध्ये काम करण्यासाठी सात महिला कामगार ठेवल्या आहेत. यातील काही महिला ममता यांच्या बेडरुममध्ये साफसफाईचे काम नियमितपणे करतात. 28 नोव्हेंबर रोजी ममता या लग्नात दागिने घालण्यासाठी तिजोरीवर ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स काढण्यासाठी गेल्या. मात्र त्यांना तेथे बॉक्स सापडला नाही. या बॉक्समध्ये सोन्याचा हिरे मढवलेला 14 लाख रुपयांचा हार आणि एक सोन्याचे हिरे व मोती मढवलेले चार लाख रुपयांचे ब्रेसलेट होते. असे एकूण 18 लाखाचे दागिने चोरीला गेले आहेत.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.