पुणे, 20 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीची विक्री होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. मात्र या मागणीला संबंधित कंपनीकडून हवा तसा प्रतिसाद दिला जात नव्हता. मागील वर्षी कंपनीने नाव बदलण्याची घोषणाही केली, मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. आता अखेर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बिडीची आता 'साबळे बिडी' या नावाने विक्री होणार आहे. त्यामुळे 'संभाजी ब्रिगेड' सह इतर अनेक संघटनांनी आपल्या लढ्याला यश आलं आहे, असं म्हणत या कंपनीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
कंपनीला करावा लागला होता विरोधाचा सामना
'कोल्हापूर येथे 20 ऑगस्ट 2020 रोजी संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडीची गाडी पकडली आणि ज्या ज्या ठिकाणी विक्री केली जात होता त्या व्यापाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने विरोध करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा विक्री करण्यास बंद केले व सुमारे 20 लाख रुपयाचा जुना माल कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघेरे कंपनीला परत पाठवला. त्यानंतर 10 सप्टेंबर 2020 रोजी साबळे कंपनीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नाव बदलणार हे जाहीर केले. त्यानंतर आता इचलकरंजीत मागील पंधरा दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परत गाड्या अडवल्या. कारण नाव संभाजी महाराजांचे असल्यामुळे ते कुठल्याही 'शिवप्रेमी' कार्यकर्त्याला सहन होत नव्हते. त्यामुळे साबळे वगैरे कंपनी द्या तात्काळ निर्णय घ्यावा लागला,' अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, संभाजी बिडीविरोधात अकरा-बारा वर्षापासूनच्या लढ्याला यश आलं असून यापुढेही महापुरुषांच्या नावाचा कोणीही गैरवापर करू नये, असंही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.