Pune crime: पुण्यात जावयाने आपल्या सासऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कपड्याच्या दुकानात शिरुन जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पुणे, 21 एप्रिल : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार चाकूने निर्घृण हत्या केली आहे. कपड्याच्या दुकानात शिरुन जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकलं. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Father in law killed in shop Pune murder caught in cctv)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक कुडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यांच्यातील वादाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आणि नांदायला येत नव्हती. याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता.
अशोक कुडले हा आपले सासरे रमेश उत्तरकर यांना भेटला आणि माझ्या पत्नीला सासरी पाठवा असे सांगत होता. मात्र, रमेश उत्तरकर यांनी त्याला नकार दिला. याच कारणावरुन बुधवारी जावई आणि सासरे यांच्यात वाद सुद्धा झाला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जावई अशोक हा सासऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कपड्याच्या दुकानात पोहोचला.
वाचा : "5 कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन" मंत्री धनंजय मुंडेंना धमकावत खंडणी मागणारी महिला कोण?
खडकी परिसरात असलेल्या रमेश उत्तरकर यांच्या कपड्याच्या दुकानात अशोक दाखल झाला. यावेळी त्याने रागाच्या भरात सासरे रमेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यात रमेश हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक याला अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. ज्यावेळी दुकानात ही घटना घडली त्यावेळी दुकानात इतरही नागरिक उपस्थित असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे मात्र, कुणीही रमेश यांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वर्ध्यात 14 वर्षीय मुलगी होती बेपत्ता, 5 दिवसांनी शेतातील खड्ड्यात आढळला मृतदेह
मागील पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे उघडकीस आली आहे. रितिका काखे असं या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पवनार येथील अल्पवयीन मुलगी ही शनिवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारी सेवाग्राम पोलिसांत तिच्या आईने दिली होती. तक्रारीची दखल घेत सेवाग्राम पोलिसांनी आपला तपास चालू करीत मुलीचा शोध घेतला. तपासा दरम्यान पोलिसांनी 30 वर्षीय सतीश जोगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसी हिस्का दाखवल्यावर त्याने पाच तासांनी आपला गुन्हा कबुल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.