वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 16 जुलै : पुणे शहराचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात, असं असलं तरी घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली म्हणून चक्क 20 वर्षानंतर पुण्यातील वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे. पुण्यातील वानवडी येथे फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटी असून या सोसायटीत जवळपास 279 हून अधिक फ्लॅट धारक आहे. संध्या होनावर (65) आणि त्यांचे पती सतिश होनावर (72) या दोन्ही ज्येष्ठ दांपत्याने 2002 साली इथं सातव्या मजल्यावर घर खरेदी केलं. घर खरेदी केल्यावर त्यांनी वास्तूशांती केली. पुजाऱ्यांनी या दाम्पत्याला घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती बसवायला सांगितली, तेव्हा दाम्पत्याने 2002 साली घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली. त्यानंतर 2005 साली सोसायटी रजिस्टर करण्यात आली. मूर्ती घराबाहेर बसवल्यामुळे तब्बल 20 वर्षानंतर सोसायटीकडून 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आत्ता हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. ‘आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा आम्ही वास्तू शांती केली आणि तेव्हा आम्ही आमचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती घराबाहेर बसवली तीही कागदापासून बनवलेली, गणपती बाप्पांची मुर्ती जवळपास तीन ते साडेतीन फुटांची आहे, ती आम्ही घराच्या बाहेर कोपऱ्यात बसवली आणि तिची नित्त्तनियमाने पूजाही आम्ही करत असतो. तसंच आजूबाजूला राहणारे लोक देखील येता जाता बाप्पाचे दर्शन घेतात. माझे पती सतिश होनावर हे 2002 पासून याच सोसायटीचे सदस्य असून 2016 ते 18 या कालावधीमध्ये ते सोसायटीचे चेअरमन होते, मात्र त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2019 ला सोसायटीवर नवीन बॉडी आली आणि त्यानंतर नवे नियम आले’, असं संध्या होनावर यांनी सांगितलं. ‘नवीन आलेल्या बॉडीने एक निर्णय घेतला की सदनिकेच्या बाहेर सोसायटीची जागा असून त्याठिकाणी सदनिकेच्या बाहेर असणाऱ्या लॉबीमध्ये जागेत चप्पल स्टँड कोणी ठेवायचा नाही तसंच झाडांच्या कुंड्या किंवा अडगळीचे सामान ठेवायचे नाही. ठेवल्यास शासनाच्या नियमानुसार महिन्याच्या टॅक्सच्या पाच पट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल, असा निर्णय सोसायटीने घेतला. यानंतर होनावर यांना 2019 मध्ये नोटीस पाठवली की तुम्ही देखील घराबाहेर बसवलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाका, पण होनावर यांनी ती मूर्ती काढली नाही आणि त्यांना आत्ता सोसायटीने गणपतीची मूर्ती बाहेर ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपये दंड लादण्यात आला’, असं संध्या होनावर म्हणाल्या. ‘जेव्हा नोटीस दिली तेव्हा पासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आम्ही जे केल आहे ते चुकीचं नसून आम्ही घर घेतल्यापासून मूर्ती बसवली आहे. आत्ता हे लोक आमच्यावर दबाव आणत आहेत, हे का करत आहे ते देखील माहीत नाही, पण जीव गेला तरी चालेल बाप्पांची मूर्ती ठेवल्या ठिकाणावरुन हलवणार नाही. मी ज्या मजल्यावर राहतो त्या ठिकाणी असलेल्या लोकांना मूर्तीचा त्रास नाही. उलट ती लोक दिवा बत्ती करतात, मग सोसायटी बॉडीलाच का त्रास वाटतो. आमचा शेवटचा मजला आहे तीन सदनिकेतील लोकच इथे वावरतात, यांना काय त्रास आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया सतिश होनावर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







