Home /News /pune /

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सावर्जनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचं आज संध्याकाळी निधन झालं आहे. गोडसे यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

    पुणे, 6 डिसेंबर : पुण्यातून (Pune) एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सावर्जनिक गणपती ट्रस्टचे (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust) अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे (Ashok Godse death) यांचं आज संध्याकाळी निधन झालं आहे. गोडसे यांनी ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना यकृताच्या कर्करोगाशी संबंधित आजाराचे निदान झाले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची आज संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पुण्यातील हजारो गणेश भक्तांकडून शोक व्यक्त केला जातोय. अशोक गोडसे यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी, 1 मुलगी, 1 मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

    अशोक गोडसे 2010 पासून ट्रस्टचे अध्यक्ष

    अशोक गोडसे सुमारे 50 ते 55 वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. ते 2010 पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालकपदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अशोक गोडसे यांनी 1968 साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 1996 मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. त्यांची 2001 मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली होती. त्यानंतर त्यांची 2010 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. दरवर्षी होणाऱ्या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असायचा.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या