पुणे, 10 ऑक्टोबर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्नत्वाला पालकांनी विरोध केला म्हणून माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने साधारण 50 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले पोस्टाने घरी पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकांना मानसिक धक्का बसला असून, शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सरकारने शाळेविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली आहे. कोथरूडमधील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळा राज्य मंडळाशी संलग्न होती. या शाळेने 'सीबीएसई' संलग्नत्व घेतले. ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलने केली. तसंच शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार ही केली. मात्र, विभागाने नोटीस पाठविण्याच्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
त्यानंतर पालकांनी शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. कडू यांनी चौकशी करून, सीबीएसई शाळेची एनओसी रद्द करण्याच्या कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्याचं समोर आले आहे. 'आता ऑनलाईन शाळा सुरू होऊन सहा महिने झाले आहे. शाळेचं काहीच गणित आम्हा पालकांना कळत नाही. आता पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखले पाठवले आहे. आम्ही करायचं काय.. आता कुठे ऍडमिशन मिळेल आमच्या मुलांना,' असे प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केले आहेत.
शाळेने मात्र पालकांचे आरोप फेटाळून लावलेत. प्राथमिक मधून माध्यमिकमध्ये जाताना आम्ही दरवर्षी दाखले देतो. माध्यमिकला पुन्हा नव्यानं प्रवेश प्रकिया करावी लागते, असं मुख्याध्यापिका माधुरी गोखले यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news