Home /News /pune /

अर्ध्या तासाच्या पावसामुळे दाणादाण! पुणे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस

अर्ध्या तासाच्या पावसामुळे दाणादाण! पुणे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस

पुण्यातील काही भागात देखील पावसाचं (Pune Rain) आगमन झालं. कडकडीत उन्हापासून हवेत काहीसा गारवा देणारा हा पाऊस पुणेकरांसाठी मात्र सुखद नव्हता.

पुणे, 13 एप्रिल: राज्यातील काही भागात सध्या पाऊस होत आहे. पुण्यातील काही भागात देखील पावसाचं (Pune Rain) आगमन झालं. कडकडीत उन्हापासून हवेत काहीसा गारवा देणारा हा पाऊस पुणेकरांसाठी मात्र सुखद नव्हता. कोथरूड परिसरात सोमवारी संध्याकाळी अर्धा तास पाऊस झाला मात्र या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली होती. कोथरुड भागात केवळ अर्ध्या तासाच्या पावसामुळे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं पितळ उघडं पडलं आहे. गणंजय सोसायटी डीपी रोड याठिकाणी असणाऱ्या माधवड चौकात मुख्य रस्त्याच्या ड्रेनेज मधील सांडपाणी या पावसानंतर बाहेर पडले आहे. यामुळे माथवड बिल्डिंग, निसर्ग सुंदर, ओमकार अपार्टमेंट या सोसायटीतील पार्किंगमध्ये पाणी साचले आहे. काल पासून अजूनही पाणी साचून, तुंबून राहिले आहे. हे सर्व सांडपाणी माथवड बिल्डिंग ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत गेले आहे. या परिसरात सिमेंट काँक्रिटचे केलेले रस्ते वर आणि घरं खाली अशी अवस्था काही ठिकाणी आहे. या भागात वारंवार ही समस्या उद्भवत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. 2017 मध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. फोटो/व्हिडीओ सौजन्य- योगेश माथवड
फोटो/व्हिडीओ सौजन्य- योगेश माथवड
सोमवारी कोथरुडमधील या परिसरात ड्रेनेजमधील पाणी बाहेर आल्यानंतर अग्निशमन विभागाची गाडी याठिकाणी पोहोचली होती, पण त्यांच्याकडे पाणी उपसण्याचं मशीन नव्हतं. हे मशिने पालिकेकडे आहे पण पालिका प्रशासन एकंदरितच पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उदासीन आहे. कालच्या अर्ध्या तासांच्या पावसामुळे याठिकाणी दूर्गंधी पसरली आहे. इतकच नव्हे तर अंघोळ आणि शारिरीक स्वच्छतेसाठी जे पाणी वापरलं जातं त्यामध्ये हे ड्रेनेजचे घाण पाणी मिसळल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

पुढील बातम्या