पुणे, 21 जानेवारी : पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटच्या आग दुर्घटनेत सहाव्या मजल्यावर 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मयत हे बांधकाम मजूर असल्याची शक्यता आहे. तसंच वेल्डिंग करताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याने खळबळ उडाली. हडपसरजवळील गोपाळ पट्टीत असणाऱ्या सिरम प्लांटला ही आग लागली.
अपघातातील मृतांची नावे :
बिपिन सरोज - उत्तर प्रदेश
रमा शंकर - उत्तर प्रदेश
सुशील कुमार पांडे - बिहार
महेंद्र इंगळे - पुणे
प्रतीक पाष्टे - पुणे
मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली?
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. याबाबत त्यांनी आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहितीही दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
'पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे,' असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
लसनिर्मितीवर परिणाम होणार का?
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही. आग नवीन इमारतीच्या ठिकाणी लागली आहे. त्यामुळे या आगीचा लसनिर्मितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटद्वारे सांगण्यात येत आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या BCG लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तेव्हा या इमारतीचीसुद्धा पाहणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Pune