पुणे जिल्ह्यात लालचेपोटी ज्येष्ठ नागरिकाचाच केला खून; एकाला अटक तर दुसरा फरार

पुणे जिल्ह्यात लालचेपोटी ज्येष्ठ नागरिकाचाच केला खून; एकाला अटक तर दुसरा फरार

एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याच्या शोधात पोलीस आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी माहिती दिली.

  • Share this:

पुणे, 15 ऑगस्ट : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-पिंगळवाडी येथील रहिवासी सुदाम विठ्ठल लांडे (वय 60वर्ष ) यांचा दोन जणांकडून खून करण्यात आला आहे. सुदाम लांडे यांना लोखंडी हातोड्याने मारहाण करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून घेऊन त्यांचा खून केला. या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात घोडेगांव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याच्या शोधात पोलीस आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी माहिती दिली.

सुदाम विठ्ठल लांडे हे बेपत्ता झाल्याची फिर्याद घोडेगांव पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत लांडेवाडीच्या अंगणवाडीजवळील कॅनॉलजवळ जंगलात सोमवार 22 जून रोजी मिळाला. परंतु सदर ठिकाण मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. संबंधित इसमाचा संशयास्पद मृत्यू असल्याने त्यादृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला .

मयत सुदाम लांडे यांचा मुलगा अक्षय लांडे यांनी माझ्या वडिलांचा खून झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात लांडेवाडीची अंगणवाडी गावच्या हद्दीत डिंबा उजवे कॅनॉलच्या जवळ जंगलात विकी सुरेश एरंडे (रा. हुलेस्थळ नारोडी) ,ऋषिकेश रमेश मोरे (रा.नारोडी ) या दोघांनी सुदाम विठ्ठल लांडे यांना मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवून नेवून लोखंडी हातोड्याने मारहाण करुन त्यांचा खून केला.

त्यांच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि 3 ते 4 हजार रुपये रोख रक्कम काढून घेवून त्यांचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. सदर गुन्हा मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने घोडेगांव पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी गुरुवार ( ता13) रोजी वर्ग केला आहे.

ऋषिकेश रमेश मोरे याला घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. घोडेगाव न्यायालयाने त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर विकी सुरेश एरंडे याच्या मागावर पोलिसांचे पथक असून लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.

Published by: Akshay Shitole
First published: August 15, 2020, 2:27 PM IST

ताज्या बातम्या