Home /News /pune /

Pune Alert : उजनीचं पाणी रस्त्यावर, सोलापूर रस्त्यावरची वाहतूक थांबवली; मुठेतही पाणी सोडण्याची शक्यता

Pune Alert : उजनीचं पाणी रस्त्यावर, सोलापूर रस्त्यावरची वाहतूक थांबवली; मुठेतही पाणी सोडण्याची शक्यता

उजनी धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने पूरस्थिती ओढवली आहे. सोलापूर दिशेने प्रवास करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. पुण्यातला पाऊस थांबला नाही तर मुठा नदीपात्रातही पाणी वाढू शकतं.

पुणे, 14 ऑक्टोबर : पुणे, सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Pune rain update) रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या (Solapur) उजनी धरणाचं पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर इथे महामार्गाववर आलं असल्याने सोलापूर हायवेवरची (Pune Solapur highway closed) वाहतूक थांबवली आहे. पुणे शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याने रात्री उशीरा मुठा नदीपात्रातही पाणी सोडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (weather alert) देण्यात आला आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात धोका निर्माण झाला आहे. उजनीतून होणारा विसर्ग 200,000 क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुण्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. पुण्यातून सोलापूरकडे जाणारी वाहतूक लोणी काळभोर इथे थांबविली असून कोणीही सोलापूर दिशेने प्रवास करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्राकडे निघालेलं तुफान आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आहे. संध्याकाळपासून जिल्ह्यातल्या अनेक भागांना धुवांधार पावसाने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची दैना उडवली. अनेक भागातली वीज गायब झाली आहे. सोलापूरलगच्या तालुक्यांना जबर फटका बसला. इंदापूर तालुक्यातल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे. पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड पाण्याचे लोंढे वाहात येत असल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भिगवण आणि इंदापूरच्या मध्ये महामार्गावर सुमारे दोन फूट पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा अवघड झाली आहे. पुणे जिल्ह्यात तुफान आलं! विजांच्या कडकडाटासह आलेल्या धुवांधार पावसाने इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलं. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं अशा प्रकारे प्रवाहाबरोबर वाहून जाताना फक्त बघत राहावं लागलं. इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी भागात एक गाडी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहात जातानाचा VIDEO व्हायरल होत आहे.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

पुढील बातम्या