'मी जगण्याला कंटाळलो आहे', पुण्यात पोस्ट लिहून व्यक्ती आत्महत्या करणार इतक्यात...

'मी जगण्याला कंटाळलो आहे', पुण्यात पोस्ट लिहून व्यक्ती आत्महत्या करणार इतक्यात...

फेसबुक पोस्ट लिहित पुण्यातील एका व्यक्तीने खळबळ उडवून दिली होती.

  • Share this:

पुणे, 24 ऑगस्ट : 'मला जगण्याचा कंटाळा आला आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. सर्वांचे मनापासून आभार. मला माफ करा,' अशी फेसबुक पोस्ट लिहित पुण्यातील एका व्यक्तीने खळबळ उडवून दिली होती. मात्र पोलीस यंत्रणेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

लॉकडाऊन , आर्थिक विवंचना याला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट  फेसबुकवर लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शोधून काढलं. तसंच त्याचं समुपदेशन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं. यामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने लॉकडाऊनमुळे आलेलं आर्थिक संकट आणि त्यातून आलेलं नैराश्य यामुळे आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली होती. ही पोस्ट , सांगली विटा येथील शिवसैनिकाने पाहिली आणि त्याने तात्काळ नीलम गोऱ्हे यांना या पोस्टची माहिती दिली.

या फेसबुक पोस्टचं गांभीर्य लक्षात घेऊन नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांनाच याबाबतची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी या व्यक्तीला शोधून काढण्याचे आदेश दिले. यंत्रणा कामाला लागली आणि तांत्रिक तपास करून या व्यक्तीचं लोकेशन शोधून भारती विद्यापीठ पोलीस तात्काळ तिथे पोहोचले. त्यांनी या व्यक्तीचं समुपदेशन केलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं.

आर्थिक ताण असह्य होत असल्याने वैफल्यग्रस्त होऊन पोस्ट केल्याची कबूली या व्यक्तीने दिली आणि पुन्हा असं कधी करणार नाही असं आश्वासनही पोलिसांना दिलं.

Published by: Akshay Shitole
First published: August 24, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या