पुणे, 08 ऑक्टोबर : दोन तरुणांनी चक्क बँकेलाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेकडे गहाण ठेवलेली जमीन परस्पर विकून फरार झाल्याची घटना पुण्यातील वाघोलीजवळ असलेल्या केसनंद परिसरातून समोर आली आहे. या तरुणांनी बँकेची मोठी फसवणूक केल्याचं समोर आल्यानंतर बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली असून दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळपास 20 गुंठ्यावर 2300 चौरस फुटांचं बांधकाम असलेली जमीन दोन तरुणांनी बँकेकडे गहाण ठेवून त्यावर जवळपास 55 लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं. 2014 साली नामदेव लक्ष्मण हरगुडे आणि अनिता नामदेव हरगुडे या दोन तरुणांनी ही जागा गहाण ठेवली होती. त्यानंतर दोघांनीही कर्ज न फेडल्यामुळे जागेचा लिलाव करण्यासाठी बँकेकडून काही माणसं पाठवण्यात आली. त्यावेळी बँकेतील अधिकाऱ्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून मोठा धक्काच बसला.
हे वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! 20 कोटींचे MD ड्रग्स जप्त
आरोपी दोन्ही तरुणांनी बँकेकडे गहाण ठेवलेली जागा 2018 साली परस्पर 30 लाखांना विकली होती. बँकेच्या परवानगी विना ही गहाण ठेवलेली जाग विकल्यानं आणि फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी नामदेव लक्ष्मण हरगुडे आणि अनिता नामदेव हरगुडे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊन गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणिकंद पोलिस करत आहेत. दरम्यान या दोन्ही पठ्ठ्यांनी बँकेलाच जमीन गहाण ठेवण्याच्या बहाण्यानं गंडा घातल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.