पाडव्याला खरेदी केलेला ट्रॅक्टर ठरला पिता-पुत्राचा कर्दनकाळ, अपघातात दोघांचा मृत्यू

पाडव्याला खरेदी केलेला ट्रॅक्टर ठरला पिता-पुत्राचा कर्दनकाळ, अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रॅक्टर हा छोटा होता मात्र त्याला जोडलेला रोटर जास्त वजनाचा असल्यानं वळणावर ट्रॅक्टरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

जुन्नर, 18 एप्रिल : पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junner) तालुक्यातल्या आदिवासी भागात असलेल्या राळेगन गावात ट्रॅक्टर (Tractor) अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. अत्यंत विचित्र अशा अपघातात पोलीस कर्मचारी असलेले वडील व त्यांचा तरुण मुलगा दगावला. चालक या अपघातातून बचावला. पाडव्याच्या दिवशीच खरेदी केलेल्या या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ही दुर्घटना घडल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

(वाचा - NCBकडून तिघांना अटक; 20 लाखांच्या रोकडसह ड्रग्जचा मोठा साठा जप्त)

कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तैनात असलेले सोपान उंडे सुटीवर गाली आले होते. जुन्नरमधील राळेगण हे त्यांचं गाव. उंडे यांनी पाडव्यालाच नवीन ट्रॅक्टर घेतले होते. ते घेऊन 20 वर्षीय मुलगा तेडस आणि चालक संदेश तळपे असे तिघे शेतात कामासाठी निघाले होते. शेतीच्या मशागतीची कामं करण्यासाठी हे सर्व चालले होते. मात्र जाताना रस्त्यामध्ये एक तीव्र सरळ असा चढ आला आणि त्यावर ट्रॅक्टर पुढे चढवताना चालक संदेश तळपे याचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळं ट्रॅक्टर 20 फूट खोल असलेल्या शेतात पडला. यादरम्यान ट्रॅक्टरनं एक पलटी मारुन ट्रॅक्टर पुन्हा उभा झाला. त्यात ट्रॅक्टरचं हूड दबलं आणि त्यात सोपान उंडे तसंच चालक अडकले. मुलगा तेजस मात्र तिथंच जमिनीवर पडला होता.

(वाचा - पुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं)

ट्रॅक्टर तसाच पुढं चालत गेला आणि जवळपास 100 मीटरवर जाऊन तो बांधाला धडकून थांबला. गंभीर जखमी झालेला चालक कसाबसा ट्रॅक्टरच्या हुडातून सुटका करून बाहेर आला व त्यानं आरडाओरडा केला. पण घटना घडली तेव्हा दुपारची वेळ होती आणि आजुबाजूला कुणीही नसल्यानं कुणी आलं नाही. त्यामुळं चालकानं त्याच्या घंगाळदरे व राळेगन गावातल्या लोकांना फोन करुन बोलावलं. पण लोक मदतीसाठी पोहोचले तोवर उशीर झाला होता. सोपान उंडे ट्रॅक्टरच्या हुडात अडकून जागीच मरण पावले. सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. गावकर्‍यांनी हूड बाजूला करुन त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मुलगा तेजस व ड्रायवर संदेश तळपे यांना दवाखान्यात नेलं पण वाटेतच मुलगा तेजसचाही मृत्यू झाला. चालक संदेश तळपेची प्रकृतीही चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ट्रॅक्टर हा छोटा होता मात्र त्याला जोडलेला रोटर जास्त वजनाचा असल्यानं वळणावर ट्रॅक्टरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र नवीन ट्रॅक्टरने काम करण्याच्या आनंदात शेतात निघालेल्या पिता-पुत्राचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Published by: sachin Salve
First published: April 18, 2021, 10:45 PM IST

ताज्या बातम्या