Home /News /pune /

Pune News: थरारक! बिबट्यानं थेट दुचाकीस्वारावर मारली झडप, शेजारच्या घरात आसरा घेतल्यानं वाचला जीव

Pune News: थरारक! बिबट्यानं थेट दुचाकीस्वारावर मारली झडप, शेजारच्या घरात आसरा घेतल्यानं वाचला जीव

Pune News: बिबट्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. सायंकाळी दुचाकीवरून घरी जात असताना बिबट्यानं झडप मारली होती. पण या थरारक घटनेतून तरुणानं आपला जीव वाचवला आहे.

    ओतूर, 25 जून: काही दिवसांपूर्वी ओतूर येथील निलेश घुले नावाच्या एका तरुणावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला (Leopard attack on men) केला होता. या हल्ल्यात बिबट्यानं तरुणाचे तीस पेक्षा अधिक लचके तोडले होते. पण तरुणानं धैर्यानं बिबट्याचा सामना केला होता. त्यामुळे त्याचा जीव वाचला होता. या घटनेला अजून दहाही दिवस झाले नाहीत. तोपर्यंत संबंधित घटनास्थळापासून अवघ्या 700 मीटर अंतरावर आणखी एका तरुणावर बिबट्यानं हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित युवक किरकोळ जखमी झाला आहे. पण शेजारी असणाऱ्या एका घरात आसरा घेतल्यानं त्याचा जीव वाचला आहे. अजित विठ्ठल घुले असं बिबट्यानं हल्ला केलेल्या तरुणाचं नाव आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अजित आपल्या दुचाकीनं घरी परत येत होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्याच्यावर हल्ला केला. बिबट्यानं झडप मारल्यानंतर अजित दुचाकीसोबत खाली कोसळला. दुचाकी खाली कोसळल्यानं मोठा आवाज झाला. त्यामुळे बिबट्यानं घाबरून शेताच्या दिशेनं पळाला. दरम्यान अजित दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात बिबट्या पुन्हा आवाज करत त्याच्या दिशेनं येऊ लागला. यानंतर अजितनं तातडीनं दुचाकी घटनास्थळी सोडून शेजारीच राहणाऱ्या भारत तांबे यांच्या घरात आसरा घेतला. तरुणानं प्रसंगावधान दाखवल्यानं त्याचा जीव वाचला आहे. याघटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी अजितला  ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. यानंतर पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेलं. बिबट्याच्या झडपेमुळं गाडीवरून पडल्यानं अजितला मुका मार लागला आहे. हेही वाचा-Pune Ambil Odha: आमच्या घरच्यांना मारलं, आम्ही कुठं जायचं? चिमुरडा ढसाढसा रडला 10 दिवसांपूर्वी निलेश घुले या तरुणावर याच परिसरात बिबट्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला होता. यानंतर पुन्हा याच परिसरात अन्य एका तरुणावर बिबट्यानं हल्ला केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशती खाली वावरत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack, Leopard, Pune

    पुढील बातम्या