चोराशी रोमॅन्टिक चॅट करून प्रेमात पाडले, नंतर तुरुंगात पाठवले; पुण्यातील घटना

चोराशी रोमॅन्टिक चॅट करून प्रेमात पाडले, नंतर तुरुंगात पाठवले; पुण्यातील घटना

मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट पाहून त्याने लगेच ती स्वीकारली. त्यानंतर काही दिवस पोलीस त्याच्याशी 'रोमॅन्टिक चॅट' करत होते.

  • Share this:

पुणे, 20 ऑक्टोबर : घरातील दागिने घेऊन फरार झालेल्या  चोरट्याला पोलिसांनी फेसबुकवर मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून जेरबंद केल्याची आगळी वेगळी घटना समोर आली आहे. हा चोर घरातच काम करत होतो.  त्याच्याकडून तब्बल 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा एकूण सहा लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सांगवी पोलिसांनी ही कामगिरी केली.

संदीप भगवान हांडे (वय 25, सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे. मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापूर,  जि. औरंगाबाद) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी संगीता अजित कांकरिया (52, रा. राजयोग बंगला, क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत 17 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांकरिया यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना कांकरिया यांच्या घरी पूर्वी काम करणारा नोकर संदीप याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. मात्र, तो कायम पत्ता बदलत असल्याने पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली.

फेसबुकवर मुलीच्या नाव फेक अकाऊंट तयार करून पोलिसांनी संदीपला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट पाहून त्याने लगेच ती स्वीकारली. त्यानंतर काही दिवस पोलीस त्याच्याशी 'रोमॅन्टिक चॅट' करत होते. त्याचा विश्वास बसल्यानंतर प्रेमाच्या आणाभाका देत पोलिसांनी त्याला 'कपल पॉईंटला' भेटण्यास बोलवले. त्यानुसार, संदीप मनाशी मोठी स्वप्न रंगवत मुलीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला अलगद ताब्यात घेतले.

संदीपने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.   ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या पथकाने केली.

Published by: sachin Salve
First published: October 20, 2020, 3:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या